सिन्नर फाटा परिसरात युवकाची हत्या ! - CHECKMATE NEWS
क्राईम

सिन्नर फाटा परिसरात युवकाची हत्या !


जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची चर्चा !
नाशिक : नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिन्नर फाटा परिसरात अज्ञात दोघा संशयितांनी एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून हि हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या घटनेमुळे शहरात पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 
               याबाबत माहिती अशी की, शुक्रवार दि. २ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास प्रमोद वाघ, ४०, रा, चेहडी शिव परिसर हे नाशिक-पुणे महामार्गावरील सर्विस रोडवरील लक्ष्मी दर्शन टॉवर येथील यश टायर या दुकानाबाहेर आपल्या दुचाकी वर बसलेले असताना दोघा संशयितांसोबत बाचाबाची होऊन वाद झाला. यावेळी दोघा संशयितांपैकी एका हल्लेखोराने दुकानासमोर पडलेला लोखंडी रॉड उचलला व प्रमोद वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी संशयिताने १२ ते १३ वेळेस प्रमोद वाघ यांच्या डोक्यात रॉडच्या सहाय्याने वार केले. त्यामुळे वाघ हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच संशयित हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ह्या हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती समोर येत आहे.
             नाशिक रोड पोलीस संशयितांच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार आणि नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

Translate »
error: Content is protected !!