चामर लेणी येथील खुनाचा उलगडा !
खून प्रकरणी चौघे संशयित जेरबंद !एटीएमचा पिनकोड चुकीचा दिल्याने केला खून !
नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामरलेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात ट्रक चालकाचा अज्ञात संशयितांनी खून केला असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या अज्ञात ट्रकचालकाची ओळख पटविण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चौघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे. लुटमारीच्या उद्देशाने एका निष्पाप ट्रकचालकाचा खून करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे.
म्हसरूळ शिवारातील चामर लेणीच्या पायथ्याशी रविवार (दि.२२ जून) रोजी सकाळच्या सुमारास चांभार लेणीच्या पायथ्याशी असलेल्या कच्च्या रोडवर अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या डोक्यात आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्याने पोलिसांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज लावत संशयिताचा शोध सुरु केला होता. पहिल्याच दिवशी म्हसरूळ पोलिसांना या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यात मोठे यश आले होते. या व्यक्तीचे नाव उमेश नागप्पा आंबिगार, ३४, रा. मरकुंडा गाव, ता. जि. बिदर राज्य कर्नाटक असे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मात्र, तपास संथ गतीने सुरु होता. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा संदीप मिटके यांनी गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली होती. सी. सी. टी. व्ही फुटेजमध्ये काही संशयित वाहने निदर्शनास आल्याने त्या वाहनांचा माग काढुन त्याचा विश्लेषनात्मक अभ्यास करून त्यातील एक संशयित मोटार सायकल निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. संशयित आरोपी हे म्हसरूळ व बोरगड परिसरातील राहणारे असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपी विजय मधुकर खराटे, २०, रा. वडनगर, जैन मंदिरजवळ, म्हसरूळ नाशिक, संतोष सुरेश गुंबाडे, २६, रा. गणेशचौक, कोळीवाडा, म्हसरूळ नाशिक, अविनाश नामनाथ कापसे, २०, रा. फ्लॅट नं. ८, गणेश अपार्टमेंट, राउ हॉटेल जवळ, मखमलाबाद, म्हसरूळ लिंकरोड, नाशिक, रवि सोमनाथ शेवरे, २८, रा. दत्तमंदिरच्या पाठीमागे, मानोरी गाव, पोस्ट पिंपळनारे, ता. दिंडोरी, जि. नाशिक या चौघांना ताब्यात घेतले.
या चौघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या कबुली नुसार संशयित रवि सोमनाथ शेवरे याने आरोग्य विज्ञान विदयापीठाजवळ येथे उभ्या असलेल्या एका ट्रक चालकाची रेकी करून या ट्रक चालकाकडे मोबाईल आणि भरपुर पैसे भेटतील या आशेने ट्रकमध्ये अविनाश कापसे, संतोष गुंबाडे, विजय खराटे यांनी सिगारेट पेटवण्याच्या बहाण्याने चालकास उठवले. यावेळी आंबिगार याने ट्रकचा दरवाजा उघडताच संशयितांनी ट्रकचे कॅबिनमध्ये घुसून त्यांच्याकडे जबरदस्तीने पैश्यांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष गुंबाडे याने टोकदार त्याच्या डोक्यास मारून गंभीर जखमी केले. यावेळी त्याच्या कडील दोन ए.टी.एम कार्ड काढुन घेवुन त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवुन ए. टी. एम. चा पिनकोड विचारून घेतला. यावेळी संशयित संतोष गुंबाडे हा पैसे काढण्यासाठी ए.टी.एम मध्ये गेला असता ट्रक चालकाने ए. टी. एम. चा पिनकोड चुकीचा दिल्याने व ए.टी.एम मधुन पैसे न निघाल्याने त्याचा आरोपीतांना राग आल्याने त्यांनी ट्रकचालक आंबिगार याला कॅबिनमध्ये मारहाण करून विजय खराटे याच्या दुचाकीवर बसून संतोष गुंबाडे, विजय खराटे, अविनाश कापसे यांनी ट्रक चालकाला बरोबर घेत असे चौघे जण एकाच मोटार सायकलवर बसुन ए. टी पवार शाळेजवळ अवतार पाईंट येथे असलेल्या तीन ए.टी.एम मध्ये घेवुन जात ए. टी. एम द्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ए. टी. एम पिनकोड चुकीचा असल्याने पैसे न निघाल्याचा राग आल्याने त्यांनी चामर लेणीच्या पायथ्याशी येत दांडक्याने, दगडाने, लाथाबुंक्याने मारहाण करून तेथे असलेल्या पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात नाक व तोंड बुडवून, गळा दाबुन त्याला जीवे ठार मारल्याची कबुली दिली. तसेच रवि सोमनाथ शेवरे हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवर चामर लेणी येथे येवुन मारहाण करत असतांना त्याच्या साथीदारांना कोणी पाहत आहे का ? बाबत टेहळणी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, मसपोनि जया तारडे, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, पोउनि किरण शिरसाठ, पोहवा प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, उत्तम पवार, रमेश कोळी, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, पोअं. मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, मपोहवा शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, मनिषा सरोदे, चालक पोहवा सुक्राम पवार, चापोअं समाधान पवार यांनी केली आहे.





