राजकीय हेतूने उबाठा शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हे दाखल ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

राजकीय हेतूने उबाठा शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हे दाखल !


गजू घोडके याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा !
उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी दिले पोलीस आयुक्तांना निवेदन !

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दरोडा आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याविरोधात उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत बदनामी करून खंडणी मागणाऱ्या गजू घोडके याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे. तसेच, यापूर्वी गजू घोडकेविरोधात तक्रार अर्ज देऊन देखील पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप देखील उबाठाच्या नेत्यांनी केला असून, राजकीय हेतून गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे.

              सामाजिक कार्यकर्ते किशोर उर्फ, गजू गोपालराव घोडके यांनी काही दिवसांपूर्वी उबाठाचे नेते सुनील बागुल यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ बनवून व्हायरल केले होते. हे बदनामीकारक व्हिडीओ काढून टाकण्यासाठी बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी घोडके यांना विनंती केली होती. मात्र, घोडके यांनी फेसबुकवरून वादग्रस्त व्हिडीओ काढण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनील बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी दि. ३० जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घोडके यांच्या घरात घुसून घोडके यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी घोडके यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात सुनील बागुल यांच्या सांगण्यावरून संशयित मामा राजवाडे, सागर देशमुख, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरड्या, विलास सनसे यांच्यासह इतर पंधरा ते वीस संशयितांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करून घरातील रोख रक्कमेसह अंगावरील सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
              गुन्हे दाखल झाल्यानंतर उबाठाच्या नेत्यांनी याचा निषेध केला होता. तसेच, गजू घोडके बदनामीकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रतिष्ठित आणि राजकीय नेत्यांकडे खंडणी मागत असल्याबाबत पोलीस प्रशासनाकडे अर्ज देखील केला होता. मात्र, त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचे उबाठा गटाच्या नेत्यांनी सांगितले आहे. यासाठी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड, बाळासाहेब कोकणे, मसूद जिलानी, सचिन बांडे, शैलेश सूर्यवंशी, राहुल दराडे यांच्यासह शिवसैनिकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत गजू घोडके विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे.

Translate »
error: Content is protected !!