आप्पांच्या बुद्धी चातुर्याच्या खेळीपुढे शेठ झाले “चेकमेट” !
पिंगळेंच्या राजकीय भविष्याचा आज फैसला !नाकृउ. बाजार समिती सभापती निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष !सभापती पदासाठी आज निवडणूक !
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराविरोधात पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. अविश्वासानंतर सभापती पदाची निवडणूक मंगळवार दि. ११ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सभापती पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी माजी सभापती चुंभळे यांनी ऐनवेळी बुद्धी चातुर्याचा खेळ खेळत हालचाली केल्याने त्यांची सभापती निवड निश्चित मानली जात आहे. चुंभळे यांनी थेट नऊ संचालकांना फोडण्यात यश मिळविल्याने पिंगळे यांच्यापुढे कुठलाही मार्ग उरला नसल्याने त्यांना एकप्रकारे चेकमेट बसला आहे. बाजार समितीमधील सत्ता गेल्यास पिंगळे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये १८ जागांपैकी पिंगळे यांच्या १२ तर चुंभळे यांच्या गटाच्या सहा जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर सभापती पदी देविदास पिंगळे यांची वर्णी लागली होती. मात्र, या दरम्यान पिंगळे यांनी मनमानी पद्धतीने कामकाज सुरु केले. त्यामुळे इतर संचालकांना एकत्र करत माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यात चुंभळे यांना मोठे यश आले. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत, व्यापाऱ्यांची होणारी पिळवणूक, संचालकांची मुस्कटदाबी आणि सभापतींच्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालकांनी एकत्र येत आली वज्रमूठ बांधत अविश्वास ठराव आणण्याची योजना आखली. सोमवार दि. ३ रोजी जिल्ह्याधिकारी जलज शर्मा यांच्याकडे १५ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करत अविश्वास ठरावाची प्रक्रिया प्रत्यक्षात आणत पिंगळे यांना मोठा धक्का दिला.
या अविश्वास ठरावावर माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंभळे, संपतराव महादू सकाळे, विनायक शंकर माळेकर, युवराज बाबुराव कोठुळे, सविता संजय तुंगार, जगन्नाथ हरिभाऊ कटाळे, भास्कर गोपाळ गावित, संदीप शिवाजी पाटील, चंद्रकांत दशरथ निकम, जगदीश अशोक अपसुंदे, राजाराम धोंडीराम धनवटे, तान्हाजी पांडुरंग करंजकर, कल्पना शिवाजी चुंभळे, धनाजी पुंजाजी पाटील, प्रल्हाद त्रंबक काकड यांनी स्वाक्षरी करीत शिवाजी चुंभळे यांना पाठिंबा दिला आहे.
सभापती पिंगळे यांच्या मनमानी कारभाराविरोधात संचालकांमध्ये धुसफूस सुरु होती. त्यातच सभापती पिंगळे यांच्या वाढदिवसासाठी सचिव आणि मालमत्ता विभागाकडून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून वसुली होत असल्याने बाजार समितीची प्रतिमा मलीन होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने संचालकांचा उद्रेक अधिकच वाढला आणि याचाच फायदा घेत पिंगळे गटाचे थेट ९ संचालक फोडण्यात चुंभळे यांनी यश मिळविले.





