जाको राखे साइयां मार सके ना कोई !
माता न तू वैरिणी ; नवजात अर्भकाला बेवारस सोडले !महिनाभरात पंचवटी परिसरात सापडले दोन नवजात अर्भक !
नाशिक : पंचवटी परिसरातील लामखेडे मळा परिसरातून जाणाऱ्या पाटाजवळ मोकळ्या जागेत एक स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक सापडल्याची घटना घडली आहे. परिसरातील महिलेला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने या बाळाला जीवदान मिळाले आहे. सध्या या अर्भकाला जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या अर्भकाच्या मातेला वैरिणी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून पंचवटी पोलिसांपुढे या निदर्यी मातेला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मातृ देवो भव, आईसारखं दैवत साऱ्या जगतात नाही यासारख्या उक्तींनी आईची महानता ज्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून वर्णन केली गेली आहे, त्याच भारतात मातृत्वाला कलंक लावणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात अशीच एक घटना नुकतीच पंचवटी परिसरात उजेडात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सीताराम तुळशीराम पवार, ४२, रा. मेरी पाटाजवळ, लामखेडे मळा, पंचवटी यांच्या पत्नी मंजुळा या शनिवार दि. २७ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराबाहेर आल्या असता त्यांना एका बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी आपल्या पतीला बोलावून घेतले. आणि रडण्याचा आवाज येत असलेल्या झाडाजवळ केले असता याठिकाणी एका सिमेंटच्या गोणीवर नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक दिसून आले. त्यांनी बाळाला घेत आजूबाजूला तिच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मिळून आले नाही. यावेळी या दांपत्याने अर्भकाला अंघोळ घालून पंचवटी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
अर्भक सापडल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत आजूबाजूला या अर्भकाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मिळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी जिल्हा रुग्नालयात दाखल केले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात अनोळखी पालकांविरोधात अर्भकाचा परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर बेवारस स्थितीमध्ये सोडून दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेला आठवडाभर पावसाने चांगलीच आपली हजेरी लावली होती. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी चांगली उसंत घेतली. पावसाच्या या उसंतीमुळे या नवजात अर्भकाला जीवनदान मिळाले म्हणावे लागेल. कारण पाऊस सुरु असता तर पाण्यामुळे या अर्भकाचा मृत्यू ओढवला असता. किंवा पाऊस सुरु असल्याने मंजुळा या घराबाहेर पडल्या नसत्या आई या कोवळ्या जीवाचा रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला नसता आणि पुढील मोठा अनर्थ घडला असता. मात्र, म्हणतात ना जाको राखे साइयां मार सके ना कोई !
बुधवार दि. ३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती जवळ एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळून आले होते. या मृत अर्भकाच्या हातावर हॉस्पिटलचा टॅग लावलेला होता आणि त्यावर कल्पना चौरे तसेच, एस. बी. एम. सी. एच. पी. एन. सी. नंबर ४६ असे नाव लिहिलेले आढळून आले होते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तीन आठवडे उलटत आले असून या मृत अर्भकाच्या अज्ञात आईचा शोध लावण्यात पंचवटी पोलिसांना अपयश आले आहे.





