अपहार प्रकरणातील तत्कालीन सचिव अरुण काळे यांना पोलीस कोठडी मंजूर ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

अपहार प्रकरणातील तत्कालीन सचिव अरुण काळे यांना पोलीस कोठडी मंजूर !


पोलीस कोठडीमध्ये कोणाचे नाव घेणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष ! 
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली आहे. काळे यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्ययालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या अपहार प्रकरणी काळे काय खुलासा करणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

             याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप, ५४, रा. प्लॉट नंबर २९५, गोकुळ नंद कॉलनी प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान आणि विश्वासघात केल्या प्रकरणी एप्रिल २०२४ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
             दरम्यानच्या काळात बाजार समिती प्रशासकांनी संशयित सुनील जाधव याच्या कडून पैसे वसूल करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत काळे याना आदेशित केले होते. मात्र, याकडे काळे यांनी दुर्लक्ष करून जाधव याला पाठीशी घालण्याचे काम केले होते. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायालयाने देखील काळे हे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना आरोपी का केले नसल्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी अरुण काळे यांच्याविरोधात कारवाई करीत त्यांना मंगळवार दि. ३० रोजी अटक केली होती. बुधवार दि. ३१ रोजी काळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी जवळपास दीड तास चाललेल्या युक्तिवादामध्ये तपासामध्ये सहकार्य न करणे, न्यायालयात हजर न राहणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणास्तव न्यायालयाने तत्कालीन सचिव अरुण काळे यांना सोमवार दि. ५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या पोलीस कोठडी दरम्यान कोणती माहिती उघड होणार याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 
कुठलाही भ्रष्टाचार हा एकटा अधिकारी किंवा कर्मचारी करण्याची हिंमत करीत नाही. त्यामागे राजकीय वरदहस्त असणे महत्वाचे असते. त्यात बाजार समितीमध्ये सुरु असलेले राजकारण आणि भ्रष्ट कारभार याबाबत सर्व नाशिक जिल्हा अवगत आहे. त्यामुळे पोलीस कोठडी दरम्यान काळे हे या भ्रष्टाचारामध्ये कोणाचे नाव घेता का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काळे यांना गेल्या काही महिन्यांपासून एकटे पाडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काळे यांनी जर संचालक मंडळातील कोणाचे नाव घेतल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Translate »
error: Content is protected !!