फसवणूक प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन सचिवाला अटक ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

फसवणूक प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन सचिवाला अटक !


नाशिक कृषी उत्पन्न समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक !
बाजार समितीचे बनावट पावती पुस्तक छापून ९० लाखांचा झाला होता अपहार !
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाजार समितीच्या एका बडतर्फ कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखलया प्रकरणात बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा जवळपास दोन वर्षानंतर दाखल करण्यात आला होता. अरुण काळे यांच्या अटकेमुळे नाशिकच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 
             याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप, ५४, रा. प्लॉट नंबर २९५, गोकुळ नंद कॉलनी प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले आणि विश्वासघात केल्या प्रकरणी एप्रिल २०२४ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
             नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फसवणूकप्रकरणी उच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविताना तत्कालीन सचिव यांच्या कार्यकाळात हा सर्व गैर कारभार झालेला असताना त्यांना संशयित म्हणून का गुन्ह्यात सहआरोपी म्हणून का घेतले नाही म्हणून बाजार समितीचे कान टोचले होते. तसेच, गैर कारभारातील पुस्तके जमा झाली नसताना कुठलीच कारवाई तत्कालीन सचिवांनी केली नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने मंगळवार दि. ३० रोजी बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना पंचवटी पोलिसांनी फसवणूकप्रकरणी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहे. 
या अपहार प्रकरणी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक झाली आहे. यापुढे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळातील काही संचालकांसह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सुनील जाधव हा एक लहान मासा असून खोलवर चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागून अजून काही फसवणुकीचे प्रकार समोर येण्याची शक्यता असल्याची चर्चा बाजार समितीमध्ये सुरु आहे. तसेच, एक साधा कर्मचारी वरिष्ठ अधिकारी आणि संचालक यात सहभागी असल्याशिवाय असा अपहार करूच शकत नाही. त्यामुळे जाधव याच्यावर कोणाकोणाचा वरदहस्त होता त्यांची देखील नावे तपासादरम्यान पोलिसांनी शोधावी अशी चर्चा बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे. 
बाजार समितीच्या वसुली पावती पुस्तकामध्ये फेरफार करून जवळपास ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सुनील जाधव याला बाजार समितीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन सचिव अरुण काळे यांच्यावर देखील कामकाजात कसूर केल्याप्रकरणी ठपका ठेवत त्यांना देखील बाजार समितीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. 

Translate »
error: Content is protected !!