नव्याचे नऊ दिवस होऊ नये नागरिकांची मागणी !
दुचाकी आणि मोबाईल चोर म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात !पोलीस रस्त्यावर उतरताच चोरटे झाले गजाआड !
नाशिक : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर म्हसरूळ पोलीस रस्त्यावर उतरताच त्यांच्या हाती यश आले आहे. स्टॉप अँड सर्च मोहिमे दरम्यान एक दुचाकी चोरटा आणि साडीच्या दुकानातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेत दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. नव्याचे नऊ दिवस होऊ न देता अशाच पद्धतीने कायम म्हसरूळ पोलिसांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद शिवारातील शांतीनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पटारे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हटकले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चैकशी केली. मात्र, त्याने पहिले उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपले नाव पंडित शेवण दळवी (२१, रा. चिखली, ता. पेठ, जि. नाशिक) असे सांगितले. तसेच, त्याच्याकडील दुचाकी ही ओझर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली.
शुक्रवार (दि.२६) रोजी म्हसरूळ परिसरातील कृष्णपुजा टेक्सटाईल मार्केट या दुकानात सेल्समन सलोनी डोंगरे या दुकानात काम करत असताना एक दांपत्य लहान बाळासह दुकानात साडी खरेदी करण्यासाठी आले होते. सलोनी या साडी घेण्यासाठी आलेल्या महिलेस साडी दाखवत असताना तिच्या पतीने दुकानात साड्यांच्या कप्यात ठेवलेला मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मोबाईल चोराचा माग म्हसरूळ गुन्हे शोध पथक माग काढत संशयित रंगनाथ भास्कर जगताप (रा. मडकीजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याला चोरलेल्या मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त पदमजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक दिपक पटारे, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसावे, कविश्वर खराटे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, अंमलदार पंकज चव्हाण, गुणवंत गायकवाड, पंकज महाले, योगेश सस्कर, प्रशांत देवरे, मांदळे यांनी केली आहे.





