पाच लाखांच्या सोनसाखळी एकाच दिवशी लंपास !
शहरातील महिला असुरक्षित ! अंगण झाडणे झाले मुश्किल !
नाशिक : नाशिक शहरात महिला असुरक्षित झाल्या असून एकाच दिवशी शहरातील विविध भागातून महिलांच्या अंगावरील ४ लाख ९६ हजार रुपयांचे सौभाग्याचे लेणे चोरटयांनी ओरबाडून नेले आहे. सोनसाखळी चोरांनी आपला उच्छाद मांडला असताना दुसरीकडे पोलीस यंत्रणा ढिम्म पडल्याचे दिसत आहे. सकाळी सात वाजेपासून रात्रीपर्यंत हि लूटमार सुरु असतांना पोलिसांच्या हाती एकही चोरटा लागला नसल्याने पोलीस नेमके काम करतात तरी कोणते असा प्रश्न सामान्य महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत शहरातील विविध पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकांविरोधात जबरी लुटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यासाठी सुस्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयात भाकर फिरवून पोलीस ठाण्यांना नव्या दमाचे दमदार अधिकारी देण्याची गरज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील लोकमान्य हॉस्पिटल परिसरात शिक्षिका अश्विनी राहुल सम्राट, ३४, रा. धात्रक फाटा या बुधवार दि. ४ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुलांना शाळेत सोडण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असताना पाठीमागून आलेल्या एका काळ्या दुचाकीवरील अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे २३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. तसेच, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर विजया भरत गांगुर्डे यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरटयांनी बळजबरीने खेचून पोबारा केला. तसेच, रीना अशोक कंगले, ४७, रा. बळीमंदीर- सिद्धी विनायक चौक लिंकरोड, पंचवटी या बुधवार दि. ४ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास नांदूर जत्रा लिंकरोडवरील संजीवनी बँक्वेट हॉल येथे लग्नासाठी आल्या होत्या. बाहेर रोडवर गाडी पार्क करून गाडीतून उतरून हॉलमध्ये पायी जात असताना काही समजण्याच्या आत दुचाकीवरील अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाचे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, सुनीता राजेंद्र शिंपी, ५०, रा. बजरंग चौक, दत्त चौक, नाशिक या बुधवार दि. ४ रोजी सकाळी साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे घरून दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये कामाला जात असताना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस ट्रेनिंग सेंटर ते बॉईज टाऊन स्कुलच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी येऊन चालत्या गाडीवरील सुनीता शिंपी यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून चोरटे फरार झाले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरला ईश्वर सोनवणे, ५७, रा. पोलीस क्वार्टर समोर, वासन नगर, पाथर्डी फाटा, या बुधवार दि. ४ रोजी सकाळी आठ ते सव्वा आठवाजेच्या दरम्यान घरासमोर साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. तसेच, बापू बंगला परिसरातून अजून एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने खेचून पोबारा केला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड परिसरातील शोभा भगवान पाटील, ५८, रा. प्रसाद बंगला, मराठा नगर, जेलरोड, नाशिकरोड या बुधवार दि. ४ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास स्वाध्याय केंद्रातून कॉलनी रोडने घरी पायी येत असताना घराच्या प्रवेशद्वाराजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी वृंदावन सोसायटी कोठे आहे असा पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तोंडाला रुमाल बांधलेल्या एका संशयिताने शोभा पाटील यांच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून सैलानी बाबा स्टॉपच्या दिशेने फरार झाले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी शहरात विविध ठिकाणी महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे चोरटयांनी लंपास केल्याने महिला वर्गामध्ये मोठी दहशत पसरली आहे. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंग होत असताना पोलिसांची कुठेही नाकाबंदी दिसून आली नाही. किंवा चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याना पकडण्यासाठी पोलिसांची कोणतीही यंत्रणा सजग झाली नसल्याची दुर्दैवी चित्र शहरात दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चोरटयांनी आपला उच्छाद मांडला असताना पोलीस या गुन्ह्यांची उकल करताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
सध्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अंगणात झाडू मारताना सोनसाखळी चोरी, पार्किंगमध्ये बोलत असताना सोनसाखळी चोरी, दुचाकीवरून जात असताना सोनसाखळी चोरी, पायी जात असताना सोनसाखळी चोरी, देवदर्शन करताना सोनसाखळी चोरी, लग्न समारंभात गेल्यास सोनसाखळी चोरी, घराला कुलूप लावून बाहेर गेल्यास घरफोडी, भाजी आणण्यास गेल्यास सोनसाखळी चोरी, बसमध्ये जाताना गळ्यातील आणि बॅगेतील दागिन्यांची चोरी होत असल्याने संपूर्ण शहरात महिला कुठेही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची खांदेपालट करून पोलीस ठाण्यांना नवे कारभारी दिल्यास जोमाने गुन्ह्यांची उकल होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.