अनैसर्गिक अत्याचार करून गतिमंद मुलाची हत्या ! - CHECKMATE NEWS
क्राईम

अनैसर्गिक अत्याचार करून गतिमंद मुलाची हत्या !


हत्यांच्या घटनांनी शहर हादरले ; नाशिककरांमध्ये दहशतीचे सावट !
नाशिक : नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आडगाव शिवारात पत्नीने आपल्या भावांसह नातेवाईकांच्या मदतीने नवऱ्याचा खून केला होता. तसेच, पंचवटी परिसरातील बेपत्ता महिलेचा गळा आवळून करण्यात आलेल्या खून प्रकरणातील आरोपी फरार असतानाच नाशिकरोड परिसरातील गंधर्व नगरीतील एका नव्याने विकसित होणाऱ्या इमारतीमध्ये एका आठ वर्षाच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शहरात खुनाचे सत्र सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहावर देवळाली गाव येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
करण्यात आले.
           याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिकरोड परिसरातील गंधर्व नागरी परिसरात नवरत्न अपार्टमेंट नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून सुरेश दुधाट हे काम करीत आहे. तर त्यांची पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धुणे भांडे करीत होती. याच इमारतीमध्ये हे कुटुंब तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये राहत होते. त्यांना ८ वर्षाचा ओम नावाचा गतिमंद मुलगा होता. ओम हा रविवार दि. १९ रोजी संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता. त्यामुळे ओमचा सर्वत्र शोध सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डकमध्ये आढळून आला. ओमचा मृतदेह पाहून त्याच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे आणि गुन्हेशोध पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.  
          यानंतर ओम याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला होता. सोमवार दि. २० रोजी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्वांना एकच धक्का बसला. कारण ओमचा मृत्यू बरगड्या तुटल्यामुळे झाला असल्याचे उघड झाले. तसेच, त्याचा खून करण्यापूर्वी अज्ञात नराधमाने त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी  संतापजनक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरात एकामागोमाग एक खुनाच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. 
ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून, त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहे. यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय आहे. ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. : मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त

Translate »
error: Content is protected !!