शहरात खुनाची मालिका सुरूच ! - CHECKMATE NEWS
क्राईम

शहरात खुनाची मालिका सुरूच !


महिलेसह चौघा संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; संशयित एकाच कुटुंबातले !

नाशिक : पंचवटीसह शहरात खुनाचे सत्र सुरू असताना पुन्हा एकदा किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे पार्किंगच्या किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली आहे. याबाबत मृताच्या नातेवाईकांनी संशयितांविरोधात खुनाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शव विच्छेदन अहवालमध्ये डोक्यात आणि छातीमध्ये मारहाण झाल्याने तसेच, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असल्याचा अहवाल आल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दि. २० रोजी हिरावाडी बुद्धन लक्ष्मण विश्वकर्मा, ४७, रा. केशव अपार्टमेंट, दामोदर नगर, हिरावाडी, पंचवटी यांचे पार्किंगच्या वादातून अपार्टमेंट मधील काही रहिवाशी यांच्याशी भांडण सुरू होते. दरम्यान यातील एका संशयिताने बुद्धन विश्वकर्मा यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्यस्थी करण्यास बुद्धन विश्वकर्मा गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी एका संशयिताने लोखंडी पाईप बुद्धन विश्वकर्मा यांच्या डोक्यात मारला तसेच, त्यांच्या एका मुलाला देखील जबर मारहाण करण्यात आली. यावेळी आपल्या पत्नीला उपचारासाठी बुद्धन विश्वकर्मा जिल्हा रुग्णालयात गेले असता त्यांचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दुर्दैवी मृत्यू झाला.

यामुळे संतप्त झालेल्या बुद्धन विश्वकर्मा यांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. बुद्धन विश्वकर्मा यांचा शव विच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा डोक्यात आणि छातीत मार लागल्याने आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी संशयित वसंत निवृत्ती घोडे, ४७, कल्पना वसंत घोडे,४६, विशाल वसंत घोडे, २४, गणेश वसंत घोडे, २७, सर्व रा. श्री केशव अपार्टमेंट, दामोदर राज नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक यांना ताब्यात घेतले आहे.

मयत बुद्धन विश्वकर्मा यांना मारहाण झाल्यानंतर ते पंचवटी पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना मेडिकल करण्यासाठी पाठवून दिले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आणि पुन्हा जिल्हा रुग्णालयात जात असताना त्यांना अचानक अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना झटका येवून ते जागीच कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार झाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

 


Translate »
error: Content is protected !!