नो व्हेईकल झोन आणि सीसीटीव्ही लागल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील - संदीप कर्णिक - CHECKMATE NEWS
नाशिक

नो व्हेईकल झोन आणि सीसीटीव्ही लागल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील – संदीप कर्णिक


रामकुंड येथे पोलीस आयुक्तांनी साधला स्थानिक नागरिकांशी संवाद !
नाशिक : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम रामकुंड येथे राबविण्यात आला. यावेळी परिसरातील, रहिवाशी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परिसरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, गोदावरी प्रदूषण, वाढते अतिक्रमण, भाविकांची लूटमार, रिक्षा चालकांची मनमानी याबाबत विविध तक्रारी केल्या. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तीर्थक्षेत्राचा परिसरात नो व्हेईकल झोन जाहीर केल्यास आणि गोदाघाट परिसरात सीसीटीव्ही लागल्यास अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगत त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. 
             पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवार दि. २२ रोजी रामकुंड येथे उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद सांध्यात जवळपास नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्यावर भविष्यात तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी रामकुंड तीर्थक्षेत्र असल्याने हा परिसर नो व्हेईकल झोन तसेच सायलेंट झोन जाहीर करण्याची मागणी केली. तसेच, स्थानिक धार्मिक स्थळांची माहिती देण्यासाठी माहिती कक्ष आणि हेल्पलाईन नंबर सुरु करण्याबाबत सूचना केल्या. तर, कृष्णकुमार नेरकर यांनी पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने स्थानिक नागरिकांना बरोबर घेत सिहंस्थाचे नियोजन करण्याची सूचना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी गोदाघाट परिसरात गुंडांचा वावर वाढल्याने यात्रेकरूंना मारहाण करीत लुटमारीच्या घटना वाढत असून, मंदिरांमध्ये चोऱ्यांची संख्या वाढल्याने या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. गिरीष मोहिते यांनी पंचवटी परिसरात फिरणाऱ्या रिक्षांना बारकोड लावावा त्यामुळे रिक्षा चालकाची माहिती भाविकांना मिळू शकेल आणि त्यांची लूट थांबेल, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. तर माजी नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी वाहतूक पोलीस बाहेर गावावरून आलेल्या भाविकांना नो एंट्रीबाबत दंड आकारतात ते आकारू नये, बेशिस्त रिक्षा चालकांचा बंदोबस्त करावा आणि ड्रीम कॅसल चौकात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली. रामतीर्थ सेवा समितीचे राजेंद्र फड यांनी गोदाघाट परिसरात हातगाड्यांचे आणि व्यावसायिकांचे वाढलेले अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग आणि भाविकांना सुलभ शौचालयाची असलेली वानवा याबाबत सूचना केल्या. तर दत्तू बोडके यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या गोदापार्क परिसरात अनेक आक्षेपार्ह कृत्य होत असल्याने याठिकाणी सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. 
            उपस्थित नागरिकांनी केलेल्या तक्रारी एकूण घेत पोलीस आयुक्त कर्णिक यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी गोदाघाट परिसरातील सर्व पथदीप सुरु करण्याबाबत सूचना केल्या, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यावसायिकांना दुकानाबाहेर सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले. तर भविष्यात सिहंस्थाच्या निमित्ताने मिळणाऱ्या निधीमधून कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. वाहतुकीबाबत नो व्हेईकल झोन करण्यासाठी पाठपुरावा करणार, व्यायसायिकांना सीसीटीव्ही बसविण्याबाबत आदेश काढू, सर्व सूचनांकडे जातीने लक्ष देणार असल्याचे सांगत यापुढेही सर्व नागरिकांशी कायम संवाद वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सिहंस्थासाठी येणाऱ्या निधीतून पुढील बारा वर्षांसाठी मोठमोठ्या उपाययोजना सुचविण्याचे देखील त्यांनी आवाहन केले. 
           यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्योती आमने, माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, रामतीर्थ सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, राजेंद्र फड, मुकुंद खोचे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल, सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, कृष्णकुमार नेरकर, खंडू बोडके, गुलाब भोये, विशाल गोवर्धने, महेश महंकाळे, दत्तू बोडके, वैभव क्षेमकल्याणी, नंदकुमार मुठे, राजन जोशी, गिरीश मोहिते, कल्पना पांडे यांच्यासह व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Translate »
error: Content is protected !!