आडगाव शिवारात आयशर, चारचाकी वाहनाचा भीषण अपघात ! - CHECKMATE NEWS
ठळक बातम्यानाशिक

आडगाव शिवारात आयशर, चारचाकी वाहनाचा भीषण अपघात !


अपघातामध्ये मामा भाच्यासह चौघांचा जागीच मृत्यू !

पंचवटी : (वा.) आडगाव शिवारात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चक्रधर स्वामी मंदिरासमोर झालेल्या आयशर आणि ब्रिझा वाहनाच्या भीषण अपघातामध्ये मामा भाच्यासह चौघा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला होता. तर मृतदेह देखील वाहनात अडकून पडले होते. टोल कंपनीकडून वेळीच मदत न मिळाल्याने मृतदेह काढण्यासाठी आणि वाहने रस्त्यातून बाजूला घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्क्लीत झाली होती.

शुक्रवार दि. १२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून ओझरच्या दिशेने जाणारा आयशर क्रमांक एम. एच. १५ जी. व्ही. ९१९० हा भरधाव वेगाने जात असताना आडगाव शिवारातील चक्रधर स्वामी मंदिरासमोर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर थेट दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला गेला. यावेळी ओझरकडून नाशिकच्या दिशेने येणारी ब्रिझा क्रमांक एम. एच. ०५ डी. एच. ९३६७ या वाहनाला समोरून आयशरने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती की यामध्ये ब्रिझा गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. तसेच, या गाडीत बसलेले अक्षय लक्ष्मण जाधव, २४, रा. रंगरेज मळा. इंदिरानगर, सियाजुद्दीन उर्फ सज्जू नवाब शेख, ४०, रहेमान सुलेमान तांबोळी (मामा), ४२, अरबाज चंदुलाल तांबोळी (भाचा), १९ सर्व रा. लेखानगर, सिडको हे चौघे जागीच ठार झाले. तर आयशर चालक बापू मोतीराम अहिरे, ३५, पंचशील नगर, ओझर हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली.
या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत्कार्यास सुरुवात केली. मात्र, परिसरात संपूर्ण अंधार असल्याने आणि चक्काचूर झालेल्या वाहनात मृतदेह अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यास मोठे अडथळे येत होते. मोठ्या अडचणींचा सामना करत चक्काचूर झालेल्या वाहनातून चौघांचे मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्नालयात पाठविण्यात आले.

टोल असलेल्या महामार्गावर अपघात झाल्यास मदतकार्यासाठी टोल कंपनीकडून रुग्णवाहिका आणि क्रेन पाठविण्याचा नियम आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर टोल कंपनीकडून कुठलीही मदत वेळेवर पोहोचवण्यात आली नव्हती. तसेच, घटनास्थळी आलेली क्रेन नादुरुस्त असल्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यासाठी पोलिसांना अनेक तास वाट बघावी लागली असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे अशा अपघातावेळी मदत कार्यास टाळाटाळ करणाऱ्या टोल कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

आडगाव शिवारात चक्रधर स्वामी मंदिराच्या समोर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पथदीप बंद असल्याने गडद अंधारात पोलीस आणि नागरिकांनी मदतकार्य सुरु केले होते. मात्र, वाहनाचा पत्रा कापण्यासाठी कुठलीही साधनसामग्री नसल्याने हाताने ताकद लावून दरवाजे तोडून छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. 

अपघातामध्ये ठार झालेल्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सर्व जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून कामकाज आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली आणि चौघांवर काळाने झडप घातली. अरबाज याचा महिनाभरापूर्वी साखरपुडा झाला होता. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती.


Translate »
error: Content is protected !!