पोलिसांच्या कड-कडाटावर डीजेचा दणदणाट ठरला वरचढ !
डीजेच्या आवाजामुळे पोलीस प्रशासनाची मुस्कटदाबी झाल्याची चर्चा !
नाशिक : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. मात्र, गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या कड-कडाटाने नाशिक शहरासह पंचवटी परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश देखील पोलिसांच्या देखत पायदळी तुडवला गेल्याचे दिसून आले. पंचवटी परिसरामध्ये पोलीस चौकी शेजारी शांतता समितीचा मंडप उभारून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना डीजेच्या कड-कडाटामुळे मिरवणुकीमधील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात देखील मोठे अडथळे आल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांचा आवाज डीजेमुळे दाबला गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अशा डीजे वाजवून दखनी प्रदूषण करीत उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या थाटामाटात झाल्यानंतर त्यांचे विसर्जन मंगळवार दि. १७ रोजी भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी अनेक सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्य वाद्याच्या गजरात बाप्पांना निरोप दिला. तर घरगुती गणपती बाप्पांना जयघोष करीत निरोप देण्यात आला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाप्पांना निरोप देणे शांततेत सुरु होते. मिरवणूक काढतांना पोलीस प्रशासनाने विविध पोलीस ठाण्यात सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांना नियम अटी घालून दिल्या होत्या. त्यात डीजेला आणि लेझर लाईटला पूर्णतः बंदी घालत उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेमध्ये साउंड वाजविण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच, ढोल पथकांना देखील त्यांची संख्या ठरवून देण्यात आली होती. असे असताना काही मंडळांकडून जाणीवपूर्वक या अटीशर्तींचा भंग करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा बेशिस्त मंडळांवर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार की, त्यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंचवटी परिसरात एका ग्रुपने पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता थेट रस्ता बंद करून नृत्यांगना नाचविल्या होत्या. कुठलीही पूर्व सूचना न देता रस्ता बंद करण्यात आल्याने अनेकांना अडचणींचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली गेली नसल्याने, पोलिसांचा कड-कडाट फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी पुन्हा एकदा थेट पोलीस चौकीच्या बाजूला डीजेचा दणदणाट करण्यात येऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली पोलीस अधिकाऱ्यांसमोरच करण्यात आली. इतकेच नव्हे तर या डीजेच्या कर्णकर्कश कड-कडाटामुळे पोलिसांचा आवाज देखील दाबला गेल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे संपूर्ण मिरवणुकीदरम्यान डीजेचा आणि लेझर लाईटचा झगमगाट बघायला मिळत होता. मिरवणुकीदरम्यान मात्र, नाशिक पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी काही वर्षांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर रात्री ढोल वाजविले म्हणून थेट ढोल जमा करून आपल्या अँटी चेंबरमध्ये ठेवले होते. तर, तत्कालीन पोलीस आयुक्तांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविले म्हणून थेट मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत डीजेची वाहने जवळपास तीन महिने जप्त ठेवली होती. त्यामुळे डीजे वादकांनी नाशिकमध्ये डीजे वाजविणे बंद केले होते. मात्र, अधिकारी बदलताच सर्व नियम बदलले गेले आणि नाशिकमध्ये पुन्हा डीजेचा दणदणाट सुरु झाला. अशाच प्रकारे पंचवटी परिसरात आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजेचा दणदणाट पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थित केला जात असताना त्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काही पोलीस कर्मचारी अनेकवेळा येऊन ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवत होते. मात्र, डीजे बंद करण्यास पोलिसांना अपयश आल्याने रात्री बारा पर्यंत डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा मारा सुरु असल्याचे दिसून आले.





