भाविकांचा पोलीस प्रशासनाविषयी संताप !
नाशिक : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रामकुंड परिसरात ज्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याच ठिकाणी शुक्रवारी एका संशयित महिलेने बाहेरगावावरून आलेल्या महिला भाविकाच्या हातातील हजारो रुपयांचे पर्स बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे गोदाघाट परिसरातील गुन्हेगारी पुन्हा उघड झाली आहे. तसेच रामकुंड येथील बंद असलेल्या पोलीस मदत केंद्रासमोर घटना घडली आणि संशयित महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्याने भाविकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. संबंधित भाविकांना वेळ नसल्याने याबाबत पोलिसात त्यांनी कुठलीही तक्रार दाखल केली नाही. 

           मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम बुधवार दि. २२ रोजी रामकुंड येथे राबविण्यात आला होता. यावेळी परिसरातील, रहिवाशी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परिसरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, गोदावरी प्रदूषण, वाढते अतिक्रमण, भाविकांची लूटमार, रिक्षा चालकांची मनमानी याबाबत विविध तक्रारी केल्या होत्या. पोलीस आयुक्त रामकुंड येथे येऊन एक दिवस उलटत नाही तोच रामकुंडावर शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी बाहेर गावावरून रामकुंड येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या हातामधील पंचवीस ते तीस हजार रुपये असलेली पर्स एका चोरट्या महिलेने हिसकावली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी या महिलांनी त्या चोरट्या महिलेला पकडले मात्र, झालेल्या गर्दीचा फायदा घेत हि महिला या सर्वांच्या हातातून निसटून फरार झाली. यावेळी पोलिसांची मदत मागण्यासाठी याठिकाणी असलेल्या पोलीस मदत केंद्राजवळ भाविक गेले असता पोलीस मदत केंद्राला कुलूप लावलेले आढळून आले. त्यामुळे भाविकांच्या संतापात अजूनच भर पडली.
           या संतप्त भाविकांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून झालेल्या लुटमारीची घटना कथन केली. यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रामकुंड परिसरात येऊन पाहणी केली. मात्र, संशयित महिला कुठेही आढळून आली नाही. या भाविकांना पुढच्या प्रवासाला जायचे असल्याने आणि वेळ नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास वेळ जाईल म्हणून नाशिकच्या गुन्हेगारीला शिव्या शापाची लाखोली वाहत गोदाघाटावरून काढता पाय घेतला. मात्र, या दिवसाढवळ्या आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या लुटमारीच्या घटनेवरून पंचवटी परिसरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. मात्र, पोलिसांनी पुढे येऊन याबाबत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना आणि गुन्हेगार संशयित महिलेचा शोध घेणे गरजेचे असताना असे काहीही केले नसल्याचे पुढे येत आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामकुंड येथे पूररेषेमध्ये एक पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, या मदत केंद्राचा भाविकांना कुठलाही फायदा नसल्याची परिसरात चर्चा आहे. हे पोलीस केंद्र ऑफिसप्रमाणे सकाळी दहा साडेदहा वाजता उघडते आणि रात्री आठ साडेआठ वाजता बंद केली जाते. तसेच, मदत केंद्र उघडे असताना पोलीस कर्मचारी जागेवर राहत नसल्याच्या देखील तक्रारी आहे. त्यामुळे हे पोलीस मदत केंद्र केवळ नावाला उरले असल्याचा आरोप भाविक आणि स्थानिकांनी केला आहे.