पोलीस पहाऱ्यातून पळालेला संशयित आरोपी अद्यापही पोलिसांना सापडेना !
गंभीर गुन्ह्यातील आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !अवघ्या काही तासात सराईत गुन्हेगार शोधणारी गुन्हे शाखा करते काय ?
नाशिक : गेल्या महिन्यात प्रेमसंबंधांच्या वादातून मुंबई नाका येथे एका हॉटेल बाहेर महिलेसह पुरुषांना गंभीर मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील गंभीर जखमी असलेल्या संशयितांवर पोलिसांच्या पहाऱ्यात पंचवटी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, या संशयिताने अटकेच्या धाकाने थेट पोलीस पहाऱ्यातून पलायन केले होते. या घटनेला आठवडा उलटून देखील संशयित पोलिसांना सापडला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावर नाशिककरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच, अवघ्या काही तासात सराईतांना अटक करणाऱ्या पोलीस यंत्रणेला नवख्या संशयितांकडून आठवडा उलटूनही चकवा दिला जात असल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार, दीपक कपिले व दत्ता आंधळे विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर दीपक कपिले याच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहित गोरडे याच्यासह दोन महिलांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी आणि संशयित दीपक संजय कपिले उर्फ डीके याच्यावर पंचवटी परिसरातील काट्या मारोती चौकातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्याच्यावर हल्ला करणारे आणि त्याचा साथीदार हे न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दीपक कपिले याने न्यायालयात धाव घेतली आहे.
अटकपूर्व अर्जावर सुनावणी येण्याच्या आत संशयित कपिले याने खासगी रुग्णालयातून शनिवार दि. ७ रोजी पोलिसांच्या निगराणीतून पळ काढल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. कपिले याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पत्नीसह इतर नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरु केली होती. मात्र, आठवडा उलटून देखील अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती संशयित कपिले याचा कुठलाही सुगावा लागलेला नाही.
शहरात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी काही गुन्हा केल्यास त्यातील संशयित संबंधित पोलीस ठाण्यातील किंवा गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या काही तासात मिळून येतात. मात्र, सराईत नसलेल्या गुन्हेगारांना पकडताना पोलीस प्रशासनातील तांत्रिक विश्लेषण यंत्रणा, गुन्हे शाखा, गोपनीय पथक सर्वच यंत्रणा आपले हात टेकवत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे अद्यापही प्रलंबित पडलेले दिसत आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगार सापडण्यामागे काही हितसंबंध जोपासले जातात का असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. याचा शोध देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
संशयित दीपक कपिले याच्या मागावर मुंबई नाका, गुन्हे शाखेचे पथक पाठविण्यात आले आहे. पोलिसांकडून कपिले याचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरु असून, ज्या कर्मचाऱ्यांच्या पहाऱ्यातून संशयित पळाला आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नसली तरी त्यांना संशयिताला पकडण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे. तसेच, त्यांच्या सोबत पोलीस प्रशासनातील इतर पथके देखील शोध कार्यात मदत करीत आहे. :किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त





किरणकुमार चव्हाण, 