पोलीस सुस्त, गुन्हेगार मस्त ; गुन्हेगारीसाठी नाशिकचे वातावरण पोषक ? - CHECKMATE NEWS
क्राईम

पोलीस सुस्त, गुन्हेगार मस्त ; गुन्हेगारीसाठी नाशिकचे वातावरण पोषक ?


नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरूच ; धारदार शस्त्राने युवकाची हत्या ! 
नाशिक : गुन्हेगारांशी असलेले पोलिसांचे हितसंबंध आणि त्यांना कायम पाठीशी घालण्याचे सुरु असलेले काम शहरात अशांतता पसरवत असल्याचा आरोप सध्या नाशिककरांकडून करण्यात येत आहे. त्याला कारणही तसेच म्हणावे लागेल. काही दिवसांपासून शहरात रक्तरंजित होळी खेळण्याचे काम गुन्हेगारांकडून सुरु आहे. पोलीस चौक्या फक्त नावाला उरल्या असून, पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्याने पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मुडदे पाडले जात आहे. मात्र, नाशिक पोलीस फक्त अवैध धंदे चालकांकडून सुरु असलेल्या वसुलीत दंग असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या याच ढिसाळ कारभाराचा फायदा गुन्हेगारांनी उचलला असून, शहरात खुनाचे सत्र सुरु केल्याचे दिसत आहे. यामुळेच शहराचे वातावरण गुन्हेगारीसाठी पोषक असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी सुमारास काजी मंजिल इमारतीच्या समोर पाथर्डी गाव येथे रविवारी (दि. २२) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या विल्होळी येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे, रा. विल्होळी, नाशिक याच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवला ज्यामध्ये नंदेश साळवे हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत नंदेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
          याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्यादी शशिकांत रामदास गांगुर्डे, २६, रा. संघर्ष नगर, नाशिक यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित यश उर्फ आयुष दोंदे, प्रफुल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे, करण बावळ यांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यानिमित्ताने नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाशिक पोलीस सुस्त झाले की, त्याचा फायदा उचलत शहर रक्तरंजित करण्याची खेळी पूर्वीपासून चालत आलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पोलीस ठाण्यातील कारभाऱ्यांवर कुठलाही वचक राहिला नसल्याने गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याचे बोलले जात आहे. 
चौकट : खून झाल्यानंतर संशयित आरोपी पकडणे ही पोलिसिंग नाशिककरांना नको असून, शहरात गुन्हे घडायलाच नको त्या दृष्टीने पाऊले उचलली जावी अशी पोलिसिंग व्हायला हवी अशी नाशिककरांची इच्छा आहे. सध्या नाशिकमध्ये अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. पूर्वी लपून छपून केले जाणारे अवैध धंदे आजमितीला थेट पोलीस चौक्यांच्या आजू-बाजूला सुरु करण्यात आल्याने नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा अत्यंत मलीन होत चालली आहे. पोलिसांचा धाक नसल्याने शहरात कोणीही कुठलाही रस्ता बंद करून बाया नाचवत आहे. तर संपूर्ण पोलीस दलासमोर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून डीजे वाजविला जात असताना पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास असमर्थता दाखविल्याने गुन्हेगारांना पोलिसांचेच अभय मिळत असल्याची चर्चा चौकाचौकात सुरु झाली असून, नाशिक पोलिसांचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच लागू असल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे. 

Translate »
error: Content is protected !!