धार्मिक नगरी भाविकांसाठी झाली असुरक्षित ; पोलीस गस्त नावालाच ! - CHECKMATE NEWS
क्राईम

धार्मिक नगरी भाविकांसाठी झाली असुरक्षित ; पोलीस गस्त नावालाच !


रामकुंड परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट !
स्नानासाठी नदीपात्रात उतरताच कपड्यांसह ऐवज लंपास !

नाशिक : पंचवटी परिसरात दिवसेंदिवस भाविकांच्या लुटीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. मात्र, यातील संशयित चोरट्याना पकडण्यात पंचवटी पोलीस सापक्षेप अपयशी होत असल्याचे दिसत आहे. रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या महिलांची पर्स पळविल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा मौनी अमावस्या निमित्त भाविक रामकुंडात स्नानासाठी उतरले असता त्यांच्या कपड्यांसह त्यांचे मोबाईल आणि पैसे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

            मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम बुधवार दि. २२ रोजी रामकुंड येथे राबविण्यात आला होता. यावेळी परिसरातील, रहिवाशी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परिसरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, गोदावरी प्रदूषण, वाढते अतिक्रमण, भाविकांची लूटमार, रिक्षा चालकांची मनमानी याबाबत विविध तक्रारी केल्या होत्या. पोलीस आयुक्त रामकुंड येथे येऊन एक दिवस उलटत नाही तोच रामकुंडावर शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी बाहेर गावावरून रामकुंड येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या हातामधील २५ ते ३० हजार रुपये रोख असलेली पर्स एका चोरट्या महिलेने हिसकावली. यावेळी या महिलांनी त्या चोरट्या महिलेला पकडले. मात्र, झालेल्या गर्दीचा फायदा घेत हि महिला या सर्वांच्या हातातून निसटून फरार झाली. यावेळी पोलिसांची मदत मागण्यासाठी याठिकाणी असलेल्या पोलीस मदत केंद्राजवळ भाविक गेले असता पोलीस मदत केंद्राला कुलूप लावलेले आढळून आले. त्यामुळे भाविकांच्या संतापात अजूनच भर पडल्याची घटना घडली होती. .मात्र, या भाविकांना वेळ नसल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती.
          ही घटना ताजी असताना बुधवार दि. २९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता मौनी अमावस्या निमित्त नाशिकच्या रामकुंडामध्ये स्नानासाठी दिवाकर शांताराम मोरे, ५९, रा. आनंदनगर, देवपूर, धुळे हे आपल्या मित्रासोबत आले होते. मोरे आणि त्यांच्या मित्राने आपले कपडे आणि आपले साहित्य काढून ठेवत दुतोंड्या मारोती याठिकाणी नदीपात्रात स्नान करण्यासाठी उतरले होते. स्नान करून बाहेर आल्यावर त्यांना आपले कपडे, आय फोन, महागडा गॉगल, चार हजार रुपये रोख आणि चारचाकी वाहनांची चावी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले. मोरे आणि त्यांच्या मित्रांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र, त्यांना त्यांचे साहित्य मिळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून चोरीचा गुन्हा दाखल केला.
बाहेरगावावरून आलेल्या भाविकांच्या साहित्याची चोरी किंवा त्यांची बळजबरीने लूट केली जाते. त्यानंतर या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अचानक अंगावरचे दागिने किंवा पर्स चोरी झाल्याने भाविकांची अवस्था अगदी दयनीय होऊन जाते. त्यात स्थानिकांचे सहकार्य लाभत नाही तर पोलिसांकडून सहकार्य सोडा अनेकदा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. धुळे येथील मोरे यांचे कपडे आणि मोबाइलसह चारचाकी वाहनाची चावी चोरीला गेल्यानंतर त्यांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात अनेक अडचणी आल्या असणार त्यात गाडी चालू कशी करावी हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असणार. याबात त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अद्याप त्यांचा फोन बंद असल्याचे दिसून आले. 

Translate »
error: Content is protected !!