ओझर एअर फोर्स परिसरात चंदन चोरी करणारे जेरबंद !
स्थानिक गुन्हे शाखेची कन्नड तालुक्यात धाडसी कारवाई !
शिरवाडे वाकद : निफाड तालुक्यातील एअरफोर्स परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. पोलीस पथकाने कन्नड तालुक्यात तीन दिवस पाळत ठेवत संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. एअरफोर्स परिसरातील चंदनाचे झाड चोरण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
शुक्रवार दि. २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ओझर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातून अज्ञात संशयितांनी १५ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड कापुन चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात अज्ञात चंदन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी चंदन चोरीचे गुन्हयातील अभिलेखावरील संशयित आरोपींचे सध्याचे ठाव ठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेत पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संशयितांच्या शोधासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील कन्नड तालुक्यात रवाना केले होते. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतत तीन दिवस पाळत ठेवून चंदन चोरी करणारे सराईत संशयित गुन्हेगार लियाकत अली ख्वाजा अली सैय्यद अली, रा. रिठी, ता. कन्नड, अनिस मोहम्मद शरिफ पठाण, रा.कुंजखेडा, ता.कन्नड यांना कन्नड शहरातुन ताब्यात घेतले.
या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह चंदन चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. यातील आरोपी हे चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचे साथीदार गौसखाँ हनिफ खाँ पठाण, रा. गराडा, ता. कन्नड, फारूख नवाज खान, रा.कुंजखेडा, ता.कन्नड, मुजीब पठाण, रा. माउली, ता. कन्नड, फिरोजखान पठाण मेवाती, रा.जंजाळा, ता. कन्नड, शाहरूख खान, रा. जंजाळा, ता. कन्नड यांचा पोलीस पथक शोध घेत आहे. या संशयित आरोपीनी नाशिक शहरातील अंबड एम.आय.डी.सी. व सातपुर परिसरात देखील चंदन चोरी केल्याचे उघडकीस आले असून चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील आरोपीं विरूध्द छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार जिल्हयांमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, स.पो.नि गणेश शिंदे, पो.हवा नवनाथ सानप, चेतन संवत्सरकर, पो.ना विश्वनाथ काकड, शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने केली आहे.





