४ कोटी खंडणी प्रकरणातील संशयित जेरबंद ! - CHECKMATE NEWS
क्राईम

४ कोटी खंडणी प्रकरणातील संशयित जेरबंद !


नाशिक : अपहरण करुन चार कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथुन गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. नाशिक येथील सीबीएस परिसरातून फेब्रुवारी महिन्यात दोघा भावांचे अपहरण करून मागितली होती खंडणी. 
             याबाबत अधिक माहिती अशी की, २८ फेब्रुवारी रोजी रुपचंद रामचंद्र भागवत आणि त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांचे जुने सीबीएस येथून रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी राकेश सोनार याने चार कोटी दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्याच्या पाच साथीदारांसह चारचाकीमधून अपहरण केले होते. यानंतर रुपचंद भागवत आणि विष्णु भागवत यांचे अपहरण करुन संशयितांनी त्रंबकेश्वर, वाडीवऱ्हे, मुंबई रोड अशा वेगवेगळया ठिकाणी घेवुन जात खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. 
              त्यानंतर अपहरण केलेल्या रुपचंद भागवत यांना सोडून देत दोन कोटी दहा लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी सोडुन देण्यात आले होते. आणि विष्णु भागवत याचे अपहरण करुन संशयित फरार झाले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित हा गुन्हा केल्यापासुन मध्यप्रदेश, मुंबई, पुणे अशा ठिकाणी आपले अस्तित्व लपवून फिरत असून सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाडया खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळाली. माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी.के. पवार, गणेश भागवत, प्रविण चव्हाण यांच्या पथकाने पुणे गाठून पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी परिसरात जावुन जुन्या गाडया खरेदी-विक्री करणारे व गॅरेज काम करणाऱ्यांकडे चौकशी केली. यावेळी संशयित राकेश सोनार हा सुसगाव, हिंजवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सुसगाव येथील श्री समर्थ कृपा बंगला, भगवती नगर येथे सापळा रचून संशयित आरोपी राकेश आबालाल सोनार, ३१, रा. पाटील पार्क, चुंचाळे शिवार, सातपुर नाशिक याला शिताफीने अटक केली असून पुढील तपासकामी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Translate »
error: Content is protected !!