गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !
नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये पोलिसांविषयी संतापाचे वातावरण !शहराची कायदा-सुव्यवस्था ढासळली !
नाशिक : नाशिक शहरात चोरटयांनी सामान्य नागरिकांचे जगणे अक्षरशः मुश्किल केले आहे. रात्रीच्या सुमारास घरफोडी, भरदिवसा रस्त्यावर सोनसाखळी चोरी आणि आता मुख्य बाजार पेठेतून दुकानाबाहेर ठेवलेल्या मालाचे पार्सल चोरटे घेऊन पसार होत आहे. याबाबत दुकानदार आणि व्यावसायिक चोरीची तक्रार देण्यास संबंधित पोलीस ठाण्यात गेल्यास त्यांना आम्ही तपास करतो, तुम्ही लेखी अर्ज द्या अशी कारणे देत त्यांची एकप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या चोरीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊन आणि अनेक दिवस उलटून देखील पोलिसांकडून काहीच तपास होत नसल्याने व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहराची कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचे दिसून येत आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती लेन, दहीपूल येथील जानकी टेक्स्टाईल मार्केट येथे १५ नोव्हेंबर रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने दुकानाबाहेर ठेवलेले साड्यांचे ७० हजार रुपये किंमतीचे एक पार्सल चोरून नेले आहे. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करताना साड्यांचे पार्सल चोरी झाल्याचे दुकान मालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून झालेल्या चोरीबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी फक्त दुकानावर येऊन पाहणी करून गेले आहे. मात्र, वीस दिवस उलटून देखील अद्याप चोरीचा कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी ज्या चोरीचा गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही. तर पोलीस त्याचा शोध घेणार का असाही प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे.
या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांची कुठलीही तत्परता दिसून न आल्याने चोरट्याचे चांगलेच मनोबल वाढले आहे. त्याने पुन्हा एकदा अशाच प्रकारे चोरी केली आहे. पहिल्या चोरीच्या घटनास्थळावरून अवघ्या काही अंतरावर गाडगे महाराज पुलाजवळ, दिल्ली दरवाजा येथील दहीपूल टेक्स्टाईल मार्केट येथे मंगळवार दि. ३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुकानाबाहेर ठेवलेले ३२ हजार ७६० रुपयांचे साड्यांचे पार्सल चोरून नेले आहे. याबाबत दुकान मालक मोती सिंग यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असता येथील पोलिसांनी त्यांना तक्रार अर्ज देण्यास सांगत वेळकाढूपणा केला. त्यानंतर मोती सिंग यांनी तक्रार अर्ज देत सीसीटीव्ही फुटेज देखील सरकारवाडा पोलिसांना दिले आहे. मात्र, चोरीच्या घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांकडून कुठलीही विचारणा करण्यात आलेली नसल्याची माहिती सिंग यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरीचे सत्र वाढले आहे. भररस्त्यात महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले जात आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्या जात आहे. यामुळे दुचाकीवरून पडून महिलांचा जीव देखील जाण्याची शक्यता वाढली आहे. घरापुढे थांबणे, आंगण झाडणे, देवदर्शनाला, लग्नाला जाणे महिलांना मुश्किल झाले आहे. घराला कुलूप लावून बाहेर जाताच घरफोडी केली जात आहे. भर चौकातील बाजारपेठेतून चोरटे मालाची चोरी करीत आहे. त्यात पोलीस कुंभकर्णाच्या झोपेत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.
तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यास त्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करून घेणे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, पोलीस ठाण्यातील कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. आणि तक्रार अर्ज देण्यास भाग पाडतात . तर दुसरीकडे सामान्य नागरिक काही तक्रार घेऊन त्याबाबत तक्रार अर्ज देण्यास गेल्यास पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज घेण्यास टाळाटाळ केली जाते. तसेच, वरिष्ठांचे आदेश असल्याची पुष्टी जोडायला विसरत नाही. अशा पद्धतीने वास्तवात शहरातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे किरकोळ कारवाईचा मोठा गाजावाजा करून सोशल मिडीयावर व्हायरल करून आपली वाहवा करण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचीच यंत्रणा व्यस्त असल्याचे दिसत आहे.





