खुनातील संशयितांना पोलीस कोठडी !
मद्यधुंद मित्रांनीच केला होता मित्राचा खून !
नाशिक : पंचवटी कारंजा परिसरात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन खुनाच्या घटनेमध्ये झाले होते. या खूनप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. भर चौकात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली होती. या खून प्रकरणातील संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


पंचवटी कारंजा पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर मंगळवार दि. १० रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अतुल अशोक सूर्यवंशी, ३०, रा. श्रीधर कॉलनी, मेहरधाम, म्हसरूळ या युवकाची नरोत्तम भवन समोरील रस्त्यावर किरकोळ वादातून त्याच्यासोबत असलेल्या संशयित प्रविण ऊर्फ बादल पवन वाघ (२३, रा. एरंडवाडी, पेठफाटा) आणि हितेश जगन्नाथ वाघ (३२, रा. फ्लॅट नं. ६, राजपाल कॉम्प्लेक्स, पेठफाटा) या मित्रांनी किरकोळ वादातून मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. संशयित हे एम. एच. १५ इ. क्यू. ०८९८ या दुचाकीवरून पळून जात असताना पोलीस कर्मचारी सचिन अहिरे यांनी पाठलाग करून खुनातील संशयित प्रवीण वाघ याला ताब्यात घेतले. तर दुसऱ्या संशयित बादल वाघ याला पंचवटी पोलिसांनी वडाळी भोई ते सोग्रस फाटादरम्यान अटक केली होती.
बुधवार दि. ११ रोजी संशयित प्रवीण वाघ आणि हितेश वाघ यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या संशयितांना शनिवार दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलीस खुनाचे नेमके कारण किरकोळ भांडण होते की, अजून काही होते याचा शोध घेणार आहे. या संशयितांवर यापूर्वी काही गंभीर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्योती आमने करीत आहे.





