नाशिक रोड परिसरात गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ !
एका संशयिताला अटक तिघांचा शोध सुरु ! अवैध शस्त्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
नाशिक : नाशिकरोड परिसरात एका टोळक्याने दहशत माजविण्याच्यादृष्टी कोनातून थेट हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात वाढत्या अवैध शस्त्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येताना दिसत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी सुयोग खंडेराव गुंजाळ, ३२, रा. माणिकमोती सोसायटी, मॉडेल कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, भागवत आणि एक अनोळखी युवक यांनी रविवार दि. २२ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादावरून संशयित संतोष पिल्ले याने आपल्या जवळील बंदुकीमधून फायर केला. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील संशयित नितिन राजेंद्र बर्वे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या कडून गावठी कट्टा जप्त केला आहे. तसेच, गोळीबार प्रकरणातील इतर फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.
फिर्यादी सुयोग गुंजाळ आणि संशयित नितीन बर्वे मध्ये वाद झाले होते. त्यानंतर या संशयितांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेलरोड येथील मॉडेल कॉलनी शिवशक्ती जलकुंभ येथील गार्डन परिसरात संशयित संतोध पिल्ले याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार केला. यावेळी फिर्यादी गुंजाळ याच्या मित्राने या घटनेची माहिती गुंजाळ याला देत घटनास्थळी येण्यास मज्जाव केला. त्यानंतर गुंजाळ याने दोन दिवसांनंतर पोलिसांना गोळीबाराची माहिती दिली आणि घटनेला वाचा फुटली.
अवैध गावठी कट्टे आणि तीक्ष्ण हत्यारांचा प्रश्न पुन्हा यानिमित्ताने उभा राहिला आहे. शहरात सर्रास अवैद्य हत्यारांचा वापर केला जात आहे. ज्यामध्ये गावठी कट्टा, तलवार, कोयते, चॉपर हे शस्त्र खुलेआम बाळगले जातात आणि त्याचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी सर्रास वापरले जातात. असे असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. गावठी कट्टा कुठून येतो याचा ठाव ठिकाणा पोलिसांना माहीत नाही का ? तलवार, कोयते, चॉपर अशी धारदार शस्त्र गुन्हेगारांना कुठून उपलब्ध होतात ? कोण त्याचा पुरवठा करतो ? ही हत्यार कोण तयार करत असेल ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस का करत नाही ? कोणीही कोणाच्याही सुपार्या घेऊन सर्रास धमकी देणे किंवा प्रसंगी जीवघेणा हल्ला करत जीव घेण्याचे देखील प्रकार शहरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही पोलिसांची कार्यक्षमता का कमी पडते ? यासह अनेक प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर, मुक्त संचारावर किंबहुना जगण्यावर गुन्हेगारांनी आपला प्रभाव निर्माण करत पोलीस यंत्रणेला स्पष्ट आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. जे पोलिसांना दिसूनही त्यांनी अगदी पहा आणि थंड बसा असे धोरण अवलंबले जात आहे असाच भास बघणाऱ्यांना होत आहे.





