अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर ?  - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर ? 


एन्काऊंटर मुळे पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात !

नाशिक : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयितांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. या एन्काउंटरमध्ये संशयित अक्षय शिंदेला गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या एन्काउंटरमध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या एन्काउंटरमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्याय मिळाला असल्याची भावना निर्माण होत असली तरी दुसरीकडे या एन्काउंटरवर शंका उपस्थित करीत अनेकांनी मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी एन्काऊंटर केल्याची भावना व्यक्त केली आहे. अशा अनेक प्रश्नांमुळे मुंबई पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहे. 

           गेल्या काही दिवसांपूर्वी चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली होती. डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. साडेचार वर्षांच्या लेकी सोबत अत्याचार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. संशयित आरोपीने इतक्या निर्दयीपणे चिमुरडीवर अत्याचार केला होता की, पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली होती. या संतापजनक घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरत रेल रोको आंदोलन करत सरकारसह पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर संशयित आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. 
           सोमवार दि. २३ रोजी संध्याकाळच्या सुमारास बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याची बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला बदलापूर येथे ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 
           मात्र, हा एन्काउंटर मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी करण्यात आला असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. तसेच, संशयित अक्षय शिंदेने पोलीस अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर कशी काय घेतली, त्याला रिव्हॉल्वर चालवता येत होती का, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील त्याने रिव्हॉल्वर हिसकावण्यात यश कसे मिळविले, पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला असताना गोळ्या पायावर न मारता थेट खांद्यावर आणि चेहऱ्यावर का मारल्या असे एकनाअनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात असल्याने मुंबई पोलीस स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्याचे दिसत आहे. आरोप झाल्याने या प्रकरणाची नक्कीच चौकशी केली जाईल. तसेच, शंका उपस्थित करणाऱ्यांच्या देखील प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला आणि महाराष्ट्र पोलीस दलाला द्यावे लागणार आहे. 

Translate »
error: Content is protected !!