निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे !


मुंबईतून ६ पोलीस निरीक्षकांची नाशिक शहर पोलीस दलात बदली !

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. मुंबई शहरातून १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागांमध्ये करण्यात आल्या आहे. यातील ६ पोलीस निरीक्षक नाशिक शहर पोलीस दलाला लाभले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखा युनिट एक आणि पंचवटी पोलीस ठाण्याचा कारभार एकच अधिकारी पाहत असल्याने याठिकाणी देखील बदलाची चर्चा सुरु झाली आहे. 

             गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांसह महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. 
            शुक्रवार दि. ४ रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी एक आदेश काढून मुंबई शहरातील १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना ठाणे शहर, लोहमार्ग मुंबई, मिरा- भाईंदर-वसई-विरार, रस्त्नागिरी, पिंपरी-चंचवड, नागरी हक्क संरक्षण, पुणे शहर, महामार्ग सुरक्षा पथक, राज्य गुप्त वार्ता, बीडीडीएस ठाणे शहर, नाशिक शहर, रायगड, गुन्हे अन्वेषण विभाग, सोलापूर शहर, नागपूर शहर, विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, यूओटीसी नागपूर, विशेष कृती दल, वर्धा, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र यांचे वाचक या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे.  
           या बदल्यांच्या अनुषंगाने मुंबई शहरातून पोलीस निरीक्षक अरुण महादेव सावंत, अनंत सीताराम साळुंखे, संजय सदाशिव सागवेकर, उदय सखाराम कदम, बापूसाहेब तुकाराम बागल, शिवाजी माणिकराव पासलकर यांची नाशिक शहरात बदली करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आणि मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या अधिकाऱ्यांवर चांगली जबाबदारी टाकल्यास शहरातील वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. 

नाशिकमध्ये गुन्हेगारी आणि आर्थिक सुबकता असलेले वजनदार पोलीस ठाणे म्हणून पंचवटी पोलीस ठाण्याची ओळख आहे. शहरात कुठेही गुन्हा घडल्यास त्यातील काही संशयित हे पंचवटी परिसरात राहणारे असतात असा आजपर्यंतचा लेखाजोखा राहिला आहे. यावर विशेष लक्ष देण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेतली जाते. मात्र, सध्या पंचवटी आणि शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, पंचवटी आणि गुन्हे शाखा युनिट एकचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या हाती असल्याने काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र दबंग अधिकारी देण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यात मुंबई शहर करून आलेल्या अधिकाऱ्यांवर काय जबाबदारी दिली जाणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 


Translate »
error: Content is protected !!