मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले पैसे, बाकी शेतकऱ्यांचे पीक झाले आडवे ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले पैसे, बाकी शेतकऱ्यांचे पीक झाले आडवे !


कोथंबीरीच्या फक्त ३३ जूड्याना साडेचारशे रुपये दर !
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त ३३ कोथंबीरीच्या जुड्याना साडेचारशे रुपये प्रति जुडी भाव गेला आहे. तर सरासरी बाजार समितीमध्ये आलेल्या कोथंबीरीच्या जुडीला शेकडा २१ हजार पाचशे रुपये भाव गेला आहे. तर मेथी देखील सरासरी ७० रुपये प्रति जुडी गेली आहे. आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात तेजी आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पोळ्याच्या दिवशी मोजक्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. उगाचच शेतकऱ्यांचा भाजीपाला महागला म्हणून वर्षातून दोनचार दिवस चांगले पैसे भेटल्यास गळा काढून ओरड करण्याची गरज नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. मोजक्या शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याची सत्यता कोणीही दाखवली नसल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 
              नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार दि. २ रोजी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर लिलावावेळी चांगलेच वधारलेले दिसून आले. बाजार समितीमध्ये कोथांबीर १०५ क्विंटल म्हणजेच १० हजार ५०० जुडी आली होती. या कोथंबीरीच्या जुडीला कमीतकमी १० हजार रुपये शेकडा आणि जास्तीतजास्त ४५ हजार रुपये तर सरासरी २१ हजार ५०० रुपये शेकडा भाव मिळाला. मेथी १ हजार ७०० जुडी आली होती. तिला कमीतकमी २ हजार रुपये शेकडा आणि जास्तीतजास्त २४ हजार रुपये तर सरासरी ७ हजार रुपये शेकडा भाव मिळाला. शेपू ३ हजार ५०० जुडी आली त्यामध्ये कमीतकमी २ हजार रुपये शेकडा आणि जास्तीतजास्त ४ हजार ८०० रुपये तर सरासरी ३ हजार २०० रुपये शेकडा भाव मिळाला. कांदापात ३ हजार ८०० जुडी आली. तिला  कमीतकमी १ हजार ५०० रुपये शेकडा आणि जास्तीतजास्त ४ हजार ५०० रुपये तर सरासरी ३ हजार ५०० रुपये शेकडा भाव मिळाला. असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांनी दिली. 
भिका ठोंबरे यांच्या ३३ कोथंबीरीच्या जुडीला साडेचारशे रुपये भाव मिळाल्याने त्यांच्या हातात १४ हजार ८४५ रुपये आले. सुनील पवार यांच्या १९० कोथंबीरीच्या जुडीला ३५ हजार ५०० रुपये शेकडा भाव मिळाल्याने त्यांच्या हातात ६७ हजार ४२६ रुपये आले. तर मछिंद्र शेळके यांच्या २५० मेथीच्या जूड्याना २४ हजार रुपये शेकडा दर मिळाल्याने त्यांच्या हाती हमाली वजा जाता ५९ हजार ९७४ रुपये आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 
काही माध्यमांनी कोथंबीर साडेचारशे रुपये जुडी गेल्याची बातमी चालवली. त्यामुळे रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी देखील कवडीमोलाने घेतलेल्या कोथंबीरीचे दर वाढवून टाकल्याने सामान्य गृहिणींना कोथांबीर विकत घेणे शक्य झाले नाही. सध्या बाजार समितीमध्ये शंभर रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत चांगल्या कोथंबीरीला दर मिळत असल्याचे दिसत आहे. बाजारात आवकेनुसार चढउतार सुरूच असतो त्यामुळे गृहिणींनी घाबरू नये. 
पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या डोळ्यात सणासुदीच्या काळात डोळ्यात अश्रू तरळले आहे. त्यांच्या शेतातल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाही. मोजक्या काही शेतकऱ्यांचा भाजीपाला वाचल्याने त्यांच्या हाती काही पैसे पडले आहे. मात्र, काही व्यापारी धार्जिण्या माध्यमांनी शेतकऱ्यांच्या कोथंबीरीला साडेचारशे रुपये भाव मिळाला म्हणून ओरड सुरु केली. मात्र, वास्तवात फक्त ३३ जूड्याना हा भाव गेल्याची सत्यता कोणीही मांडली नाही. 

Translate »
error: Content is protected !!