लिव्ह इन रिलेशन मध्ये चिमुरड्याची हत्या ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

लिव्ह इन रिलेशन मध्ये चिमुरड्याची हत्या !


बेदम मारहाण करीत डोके आपटल्याने झाला मृत्यू !

नाशिक : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या अवघ्या चार वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण करीत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा घरातील खाटेवरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव देखील पोलिसांनी उघड केला आहे. खुनाच्या गुन्ह्याची नोंद पुणे येथे करण्यात आली असून, पुढील तपासासाठी गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. यातील संशयित प्रियकराला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहे.

              याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक शशांक शिवाजीराव जाधव यांनी फिर्याद दिली आहे की, मंगळवार दि. ४ रोजी कुमार वेदांश वीरभद्र काळे, ४ वर्षे याचा आकस्मिक मृत्यू झाल्याप्रकरणी तपास कारण्यास सांगण्यात आले होते. याबाबत मयत वेदांश याची आई पल्लवी वीरभद्र काळे, २७, रा. मूळ रा. अप्पर बस डेपो जवळ, बिबवेवाडी, पुणे सध्या रा. कृष्णनगर, पंचवटी, नाशिक हिच्याकडे चौकशी केली असता तिने आपले पतीसोबत भांडण झाले असून, प्रियकर महेश राजेंद्र कुंभार, २३, रा. शिरूर अनंतपाळ, ता. जि. लातूर याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून समृद्धी, स्वरांजली या दोन मुली, मुलगा वेदांश यांना सोबत घेऊन पल्लवी आणि महेश हे नाशिक येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
           दरम्यान रविवार दि. १ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित राजेंद्र महेश कुंभार हा वेदांश याला पोळी खाऊ घालत असताना त्याने उलटी केली. याचा राग आल्याने महेश याने झाडूने वेदांश याला बेदम मारहाण केली तसेच, त्याचे डोके गॅस सिलेंडरच्या टाकीवर आपटल्याने त्याने डोळे पांढरे केले. यावेळी या सर्वांनी मिळून वेदांशला नाशिकच्या जिल्हा रुग्नालयात घेऊन गेले. मात्र, येथील डॉक्टरांनी मुलाची तब्बेत जास्त खराब असल्याने दुसरीकडे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यावरून वेदांश याला घेऊन सर्वजण सोमवार दि. २ रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुणे येथे कमला नेहरू हॉस्पिटल येथे आले. मात्र, येथील डॉक्टरांनी वेदांश याला तपासून मृत घोषित केले. मात्र, तपासादरम्यान वेदांश याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रियकर संशयित महेश कुंभार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
वेदांश याला मारहाण झाली नसून तो खाटेवरून पडल्याचे संशयित कुंभार याने सांगितले. तसेच, बिबवेवाडी परिसरात राहत असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांनी पहिले गुन्हा बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करून घेतला. मात्र, तपासाअंती गुन्ह्याची सुरुवात नाशिक येथे झाल्याने हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 
 
पुणे पोलिसांनी वेदांश याच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या डोक्यावर, पाठीवर, मानेवर बेदम मारहाण केल्याच्या अनेक खुणा दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी संशयित महेश कुंभार आणि त्याच्या बरोबर असलेल्या पल्लवी, मुलगी समृद्धी हिच्याकडे अधिक चौकशी केली असता नेमक्या झालेल्या घटनेचे आणि मारहाणीतून वेदांश याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेला वाचा फुटली आहे. 

Translate »
error: Content is protected !!