नाशिकच्या रणरागिणीने चालत्या बसमध्ये टवाळखोराला धुतले !
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
नाशिक : नाशिक येथील एक महिला पुण्याला शिवाजीनगर येथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान एका मद्यपी टवाळखोराने महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. या महिलेने तात्काळ दुर्गावतार धारण करीत या मद्यपीला चांगलाच धडा शिकवला आहे. मात्र, दुर्दैवाने या महिलेच्या मदतीला बसमधील इतर महिला प्रवाशी धावण्याऐवजी त्यांनी बसमधून उतरून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतरही या महिलेने न डगमगता थेट बस पोलीस ठाण्यात नेवून संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
https://youtu.be/vhuTwcquizU?si=JDczt6WT3Aa0F1qE संपूर्ण व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघा !
मंगळवार दि. १७ रोजी नाशिक येथील रहिवासी प्रिया राहुल लष्कारे या आपल्या कुटुंबियांसमवेत पुणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, या प्रवासादरम्यान एक अनोळखी मद्यपीने प्रिया यांची दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शनिपार परिसरात छेड काढण्यास सुरुवात केली. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे न डगमगता प्रिया यांनी थेट या मद्यपी टवाळखोराची गच्ची पकडून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी या बसमध्ये अनेक महिला आणि पुरुष प्रवासी देखील प्रवास करीत होते. महिलेची छेडछाड केल्यानंतर महिलेने आपला रुद्रावतार धारण करीत संशयिताला धडा शिकविण्यास सुरुवात केली. मात्र, या महिलेच्या मदतीला धावून जाण्याऐवजी सहप्रवाशांनी बसमधून उतरून जाणे पसंत केले. यामुळे या महिलेचा अजूनच संताप झाला. त्यानंतर प्रिया यांनी बसवाहक आणि ड्रायव्हर यांना बस थेट पोलीस ठाण्यात घेण्यास विनंती केली. त्यानंतर बस थेट पोलीस ठाण्यात दाखल झाली. मात्र, शनिवार वाड्याच्या समोर असलेल्या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे जवळपास अर्धा तास या टवाळखोराला या महिलेने डांबून ठेवले. त्यानंतर स्थानिक नगरसेवक अजय खेडेकर यांच्याशी संपर्क करून पोलीस मदत मिळवली.
बसमधील सर्व प्रवाशी महिला बस सोडून दुसऱ्या बस मध्ये निघून गेल्या. हे अतिशय चुकीचे आहे. आज महिलांना एकत्र येणं खूप गरजेचे आहे. तरच महिलांवरचे अत्याचार बंद होतील. आज माझ्या सोबत जे घडले ते उद्या इतर कोणासोबतही घडू शकते याचा विचार सर्वानी करणे गरजेचे आहे. : प्रिया लष्कारे





