नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच !
डोक्यात दगड घालून युवकाचा निर्घृण खून !
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
नाशिक : एकीकडे सरत्या वर्षाला निरोप देवून नाव वर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असताना दुसरीकडे मात्र, युवकाच्या निर्घृण खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून चौघा संशयितांनी एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उंटवाडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देखील शहरात खुनाची मालिका सुरूच असल्याचे दिसून आले. या खुनाच्या घटनेमुळे नवीन वर्षात कायदा सुव्यवस्था कशी असणार याचा अंदाज येत आहे. या खुनाच्या घटनेमुळे पोलिसांचा शहरात कुठलाच वचक राहिला नसल्याचे उघड झाले आहे. या खुनाच्या घटनेबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार दि. ३१ रोजी सरत्या वर्षाला निरोप देवून नाव वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले होते. या दिवशी शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस दलाच्या वतीने रस्त्यावर आणि चौकाचौकमध्ये ३ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी ६०० होमगार्ड यांची फौज उतरवली होती. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे सर्वसामान्य नाशिककरांनी घराबाहेर जाणे टाळले. अनेकांनी घरात बसूनच नवीन वर्षाचे स्वागत केले. मात्र, पोलिसांच्या या फौजफाट्याचा कुठलाही परिणाम सराईत गुन्हेगारांवर दिसून आला नाही. त्यांनी मोकळ्या जागेचा आसरा घेत दारू रिचवून खूनासरखा गंभीर गुन्हा घडवून दाखवला आहे. या खुनाच्या घटनेमुळे नाशिकची कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे. यामुळे नवीन वर्ष देखील गुन्हेगार आणि गुन्हेगारीच्या सावटाखाली नाशिककरांना व्यथित करावे लागणार असल्याचे दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिपक गणपत गारे, १८, रा. गल्ली नं. २, सप्तश्रृंगी मंदिराजवळ, क्रांतीनगर, उंटवाडी रोड, नाशिक हा मंगळवार दि. ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजता कामावरून घरी येत असताना रस्यात संशयित आरोपी रिजवान काझी, शुभम मिरके उर्फ वांग्या, गणेश भावसार आणि अरूण वळवी हे चुलत भाऊ लक्ष्मण पोपट गारे याला मारहाण करीत दुचाकीवरून घेवून जाताना दिसले. घाबरलेल्या दीपक याने ही घटना कुटुंबीयांना सांगितली. म्हणून याबाबत तक्रार देण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जात असताना दहा वाजेच्या सुमारास उंटवाडी ते मिलींदनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील बाजूस लागून असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीलगत मोकळया जागेत लक्ष्मण हा उलटा पडलेला आढळून आला. तसेच, त्याच्या डोक्याचा दगडाने चेंदामेंदा केल्याचे दिसून आल्याने या घटनेची माहिती दीपक गारे याने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, संशयितांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली.





