पंचवटी परिसर झाला असुरक्षित ; दुचाकीसह पायी चालणे झाले अवघड ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पंचवटी परिसर झाला असुरक्षित ; दुचाकीसह पायी चालणे झाले अवघड !


रस्त्यावरून पोलीस गायब झाल्याने चोरट्यांचा धिंगाणा !
अवैध धंदे वाढल्याने परिसरात चोऱ्यांच्या संख्येत वाढ !
चोरट्यांचा पोलीस असल्याचा बनाव ! लाखोंचा ऐवज लंपास ! 

नाशिक : पंचवटी परिसरातील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरून गायब झाल्याने रस्त्यावर चोरांचे साम्राज्य दिसू लागले आहे. तीन घटनांमध्ये चोरटयांनी जवळपास सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात पोलीस असल्याचा बनाव करीत एका वृद्धाचे लाखो रुपयांचे दागिने लांबवले आहे. तर, दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून महिला घरी जात असताना थेट चालत्या गाडीवर सोनसाखळी चोरटयांनी दोन लाखांची सोनसाखळी चोरून नेली आहे. तर तिसऱ्या घटनेमध्ये मावस भावाच्या लग्नाला जाणे एका कुटुंबाला चांगलेच महाग पडले असून, घरफोडीमध्ये चोरटयांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यामुळे पंचवटी परिसरात पोलिसांचे नव्हे तर चोरट्यांचे राज्य असल्याचे दिसू लागले आहे. परिसरात अवैध धंदे वाढल्याने चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. यावर पोलीस आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन परिसरातील अवैध धंदे बंद करून गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 

            याबाबत ज्योती मंगलदास भदाणे, ४९, रा. त्रिमूर्ती चौक, कामटवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दि. २६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमानं एम. एच. १५ डी. डब्ल्यू. ४६९१ वरून घरी जात असताना, अमृतधाम चौक येथील सीएनजी पंपासमोर उड्डाणपुलाखाली आले असता अचानक बाजूने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरटयांनी काही समजण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील ७० ग्रॅम वजनाची २ लाख १० हजार रुपयांची सोनसाखळी बळजबरीने ओढून के. के. वाघ कॉलेजच्या दिशेने पळून गेले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         दुसऱ्या घटनेत निवृत्ती माधवराव चौधरी, ६२, रा. श्रीराम नगर, जत्रा हॉटेल, आडगाव शिवार हे सोमवार दि. २५ रोजी सायंकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास कोणार्क नगर मधील ओंकारेश्वर गणेश मंदिरासमोरील फुटपाथवरून दत्तमंदिराकडे पायी जात असताना दोन अज्ञात संशयितांनी पुढे खून झाला असून तपासणी सुरु असल्याचा बनाव करीत त्यांच्याकडील १ लाख ५ हजार रुपये किमतीची ३६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन पोबारा केला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           त्याचप्रमाणे सचिन सुरेश सोनवणे, ३०, रा. धात्रक फाटा, नाशिक हे रविवार दि. २४ रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कुटुंबियांसोबत मावस भावाच्या लग्नसाठी मुंबई येथे विक्रोळीला गेले होते. रात्री पावणे अकरा वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. तसेच, बेडरूमधील कपाटामध्ये ठेवलेले ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ५८ हजार २११ रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
चौकट : पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचा  कुठलाही वचक गुन्हेगांवर राहिलेला दिसत नाही. त्यामुळे खून, प्राणघातक हल्ले, जबरी लूट, सोनसाखळी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, वाहने जाळपोळ, मोबाईल चोरी या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक अवैध धंदे वाढले आहे. याच अवैध धंदे चालकांकडून वसुली करण्यात पोलीस दंग असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. याचाच फायदा घेत चोरटयांनी सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याने पायी आणि दुचाकीवर चालणे देखील चोरटयांनी मुश्किल केले आहे. त्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे. 
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक हॉटेलांमध्ये सर्रास दिवसरात्र बेकायदेशीरपणे दारू विकली जात आहे. तसेच, दारू पिण्यासाठी मद्यपीना जागा देखील उपलब्ध करून दिली जात असल्याने या संपूर्ण परिसरात संध्याकाळनंतर मद्यपींचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर, याच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अंमली पदार्थ विकले जात आहे. तसेच, घरगुती गॅसचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातून पोलीस मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
पंचवटी पोलिसांनी तर अवैध धंदे चालक आणि पोलीस जणूकाही भाऊबंद असल्याचे दाखवून दिले आहे. कारण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चोरून लपून नव्हे तर थेट पोलीस चौक्यांच्या आशीर्वादाने सुरु करण्यात आले आहे. अनेक अवैध धंदे पोलीस चौकी सामोरं किंवा पोलीस चौकीशेजारी सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना या अवैध धंदे चालकांची तक्रार करावी तरी कुणाकडे असा प्रश्न पडला आहे. पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती दिल्यास तात्काळ संबंधित अवैध धंदे चालकाला तक्रारदाराचे नाव, नंबर कळविले जाते. त्यामुळे तक्रारदाराला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच पोलीस आणि अवैध धंदे चालकांची अभद्र युती असल्याचे जाहीर होत असून, यातून पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन होत आहे. याकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

Translate »
error: Content is protected !!