घरफोड्यांचे सत्र सुरूच ; अवैध दारू विक्रीचे केंद्र बनल्याने गुन्हेगारीत वाढ !
आडगाव पोलीस ठाणे परिसर बनला गुन्हेगारांचा अड्डा !
पोलीस ठाण्यातील सुभेदार वसुलीत व्यस्त !
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून शांत असलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी आपला उच्छाद मांडला आहे. खून, पोलीस बतावणी, घरफोडी, चैन स्नॅचिंग यासारख्या घटना वाढू लागल्या आहे. आडगाव शिवारात चोरटयांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिसांच्या कार्यक्षमेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. तर आडगाव पोलीस ठाण्याची हद्द जणूकाही गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचे चित्र दिसू लागले आहे. अवैध दारू विक्रीचे केंद्र बनल्याने या परिसरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलीस फक्त वसुलीत मश्गुल असल्याचे चित्र.
याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर दामू कांबरी, ५३, रा. गणेश वंदन अपार्टमेंट, हनुमान नगर, पंचवटी हे बुधवार दि. २७ रोजी दुपारी दोन वन वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. सायंकाळी चार वाजता घरी आले असता त्यांना घराचा कडीकोयंडा तोडल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता घरातील २ लाख १७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ११ हजार रुपये रोख चोरटयांनी लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हा दाखल केला आहे.
तर गीतांजली लक्ष्मण पगारे, ३०, रा. श्रीराम नगर, आडगाव शिवार या सोमवार दि. २५ रोजी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत घराला कुलूप लावून घराबाहेर गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता गीतांजली या घरी आल्या असता त्यांना घराचे सेफ्टी डोर आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी घरात बघितले असता, त्यांना घरातील २८ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ हजार रुपये रुपये रोख आणि कागदपत्रे अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, ज्ञानेश्वर दादाराव जायभावे, ३४, रा. दुर्गा नगर, अमृतधाम नाशिक, मूळ. रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. १५ सी. डी. ८४२५ हि पार्किंगमध्ये व्यवस्थित हॅण्डल लॉक करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या घटनेबाबत आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक हॉटेलांमध्ये सर्रास दिवसरात्र बेकायदेशीरपणे दारू विकली जात आहे. तसेच, दारू पिण्यासाठी मद्यपीना जागा देखील उपलब्ध करून दिली जात असल्याने या संपूर्ण परिसरात संध्याकाळनंतर मद्यपींसह सराईत गुन्हेगारांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर, याच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अंमली पदार्थ विकले जात आहे. तसेच, घरगुती गॅसचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातून पोलीस मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आडगाव शिवारात दिवसरात्र दारू पिण्यासाठी अनेक सराईत गुन्हेगार येत असल्याने ते दारूच्या नशेत परिसरात घरफोड्या करीत असल्याचा अंदाज स्थानिक रहिवाशांनी वर्तविला आहे. तसेच, हे गुन्हेगार दारूच्या नशेत असल्याने त्यांना हटण्यास गेल्यास ते अंगावर येत असल्याने त्यांना कोणीही बोलण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. तर अनेक परिसरात आडगाव पोलिसांची कुठलीही गस्त होत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.





