पोलीस हवालदाराच्या पत्नीची सोनसाखळी खेचून चोरटे फरार !
सोनसाखळी चोरांचे थेट पोलीस प्रशासनाला आव्हान !
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सराईत १७ चैन स्नेचर बाहेर निघताच शहरात त्यांनी आपला उच्छाद सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत याचा फटका आता पोलिसांना देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे चोरटयांनी थेट गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्याची पत्नी योगा करण्यासाठी पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याने एकच खळबळ उडाली असून सोनसाखळी चोरांनी थेट पोलीस प्रशासनाला एकप्रकारे आव्हान दिले असल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे.
गेल्या काही महिन्यात कारागृहात बंद असलेले १७ सराईत चैन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार कायद्याचा आधार घेत जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहे. तुरूंगातून सुटका होताच या चोरटयांनी पुन्हा आपला उच्छाद सुरु केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर अशाच पद्धतीने इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चैन स्नॅचिंग करण्यास सुरुवात केल्याने सर्वसामान्य महिलांमध्ये घबराट आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसोबत आता पोलीस दलाला देखील बसला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दीपक नाईक यांच्या पत्नी हेमा दीपक नाईक, ४४ रा. जाई बंगला, जोशी वाडा हनुमान मंदिराजवळ, हिरावाडी या गुरुवार दि. १८ रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास योगा करण्यासाठी शक्तीनगर परिसरातून पायी जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या घटनेमध्ये सोनसाखळी खेचताना हेमा नाईक या खाली पडल्याने जखमी झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याची असलेली मोठी हद्द, लाखोंच्या घरातील लोकसंख्या, त्यात अनेक झोपडपट्ट्या आणि परिसरात राहणारे शेकडो सराईत गुन्हेगार पंचवटी पोलिसांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाणे हेवीवेट पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. त्यात या पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याच्या कामाचा कायम कस लागलेला असतो. मात्र, सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे पंचवटी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट एकचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कारभार करताना कड यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा सकारात्मक विचार करून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचा पदभार कमी करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.गुन्हे शोध पथकाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : गुन्हे शोध पथक हे कोणत्याही पोलीस ठाण्याचे डोळे, कान आणि नाक म्हणून ओळखले जाते. या गुन्हे शोध पथकाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांची माहिती असणे गरजेचे असते. मात्र, पंचवटी पोलीस ठाण्यातील या गुन्हे शोध पथकाचे नेटवर्क खिळखिळे झाले असल्याने चोरटयांनी थेट पोलीस पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे धाडस दाखविले आहे. या घटनेमुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, गुन्हे शोध पथकात दबंग अधिकारी आणि कर्मचारी देण्याची देखील मागणी केली जात आहे.





