टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याने एकच खळबळ !
टोळी युध्दामुळे पंचवटी परिसरात दहशत !वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य पंचवटीकर त्रस्त ; दबंग अधिकारी देण्याची मागणी !
नाशिक : पोलिसांवरील हल्ले, खून, प्राणघातक हल्ले, तडीपार गुंडांकडून खंडणीसाठी गोळीबाराची धमकी, वाहन जाळपोळ, वाहन चोरी, भाविकांची लूट, टोळीयुद्ध आणि त्यानंतर आत्ता थेट गोळीबाराच्या घटनेने पंचवटी हादरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचवटी पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नसल्याने गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. त्याचे पर्यावसन थेट चौकामध्ये गोळीबाराच्या घटनेमध्ये झाले आहे. आठवडाभरात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात होत असल्याने पंचवटी परिसरातील थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या गुन्हेगारीचा बिमोड करण्याऐवजी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम पोलिसांकडून होताना दिसत असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात दबंग अधिकारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी परिसरातील संपलेली गुन्हेगारी पुन्हा एकदा जोमाने वाढू लागली आहे. चोऱ्या झाल्यानंतर आणि तडीपार गुंडांकडून गोळीबार करण्याची धमकी देत लूट केल्यानांतर पोलिसांनी पुढे येऊन स्वतः गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, आठवडा उलटून देखील यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा पंचवटी परिसरात सुरु झाली आहे. पंचवटी परिसराला टोळीयुद्ध नवीन नाही. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी टोळीयुद्ध करून वर्चस्व वाद करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवत त्यांची रवानगी कारागृहात केली होती. त्यामुळे गेली पाच ते सहा वर्ष पंचवटीतील गुन्हेगारी संपुष्टात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून पुन्हा हि गुन्हेगारी वाढू लागल्याने सामान्य नागरिकांचे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर संशयित ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर, रा. कमलनगर, हिरावाडी, पंचवटी आणि मयूर भास्कर पवार, रा. कोळीवाडा, गणेशवाडी, पंचवटी या दोघांमध्ये वाद झाले होते या वादाचे पर्यवसान थेट टोळीयुध्दात झाले. काहीवेळातच दोन्ही गटाचे अनेक साथीदारांनी एकत्र येत भर रस्त्यात एकमेकांच्या अंगावर बियरच्या बाटल्या, दगड, विटा फेकून परिसरात दहशत निर्माण केली होती. विशेष म्हणजे हे टोळीयुद्ध झाले त्यावेळी पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. तरीही त्याची पर्वा न करता शिवीगाळ करीत आपली दहशत करणे सुरु ठेवले होते. यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटाच्या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
मात्र, या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पंचवटी परिसरातील गजानन चौकात दोन गटांमध्ये अवैध धंद्यांच्या व्यावसायिक वादातून टोळीयुद्ध भडकले होते. या घटनेमध्ये थेट गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी योगेश जगन मोरकर, ३१, रा. जोशीवाडा, नागचौक, पंचवटी हा रविवार दि. २ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना संशयित रुपेश उर्फ वाळ्या याने बाचाबाची करण्यास सुरुवात केली. तसेच, ऋषिकेश उर्फ सोंडग्या गरड, रुपेश उर्फ वाळ्या, नितीन जाधव, हरदीपसिंग अलक आणि हर्षल नावाच्या संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवत आपली दहशत माजवली यावेळी. संशयित ऋषिकेश उर्फ सोंडग्या याने कमरेला असलेला कट्टा काढून आकाशच्या दिशेने गोळीबार करीत तुला मारून टाकतो असे म्हणाला. यावेळी योगेश याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्याला खाली पाडून फरफटत नेट गंभीर जखमी केले. तर हरदीपसिंग बलवंतसिंग औलक, २७, रा. रेणू अपार्टमेंट, नाग चौक, पंचवटी याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित योगेश, साहिल उर्फ इटली, सोहम जोशी, राहुल कानडे आणि त्यांच्या इतर चौघा साथीदारांनी रविवार दि. २ रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास हरदीपसिंग हे घराकडे पायी जात असताना संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून भांडण सुरु केले. यावेळी साहिल उर्फ इटली याने धारदार शस्त्राने हरदीपसिंग याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी संशयित सोहन जोशी, राहुल कानडे, आणि योगेश यांनी मारहाण केली. यावेळी स्थानिक नागरिक जमल्याने संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हिरावाडी परिसरात गोळीबाराची चर्चा – दोन दिवसांपूर्वी गणेशवाडी परिसरात टोळीयुद्ध झाल्यानंतर काही संशयितांनी हिरावाडी परिसरात येऊन गोळीबार केल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरु आहे. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नसल्याने या गोळीबाराची घटना दाबण्यात येत असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या गोळीबारप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करत संशयितांना गजाआड करणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मालेगाव स्टॅन्ड येथील पोलीस चौकी शेजारील हनुमान मंदिरासमोर संशयित भूषण लोंढे, प्रिन्स चित्रसेन सिंग आणि त्याचे तीन अज्ञात साथींदार काळ्या स्कार्पिओ मधून आले होते. यावेळी भूषण लोंढे याने आपल्या जवळील पिस्टल काढून त्यातून दोन राउंड गोळीबार एका सराईत गुन्हेगारावर केले होते. मात्र, या गोळीबारातून संशयित बचावल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या संशयितांनी गोळीबार केल्यानंतर पिस्टलमधून उडालेल्या दोन पुंगळ्या घेऊन घटनास्थळावरून पळ काढला असल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढे काहीही तपास झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार मालेगाव स्टॅन्ड पोलीस चौकीच्या बाहेर झाला होता.





