माजी महापौरांच्या जावयाची आलिशान कार चोरट्यांनी केली लंपास !
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !गुन्हे शोध पथक झाले शोभेचे बाहुले ! रात्रीची गस्त नावालाच !
नाशिक : पंचवटी परिसरात वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांसह भाविक हैराण झाले आहे. अशातच नाशिकच्या माजी महापौरांच्या घरासमोरून त्यांच्या जावयाची आलिशान कार चोरट्यांनी लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वाहनचोरीचे मोठे रॅकेट नाशिकमध्ये असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांसह थेट माजी महापौरांच्या जावयाची गाडी चोरून नेल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीचे आणि गुन्हे शोध पथकाचे वाभाडे निघाले आहे. ही चोरी करून चोरट्यांनी थेट राजकीय नेत्यांसह पोलिसांना एकप्रकारे खुले आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे जावई प्रवीण चंद्रकांत वाटमारे, ३३, रा. बार्शी टाकळी, जि. अकोला हे शनिवार दि. १ रोजी आपले सासरे अशोक देवराम मुर्तडक यांच्या मुर्तडक चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी येथे आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम. एच. ३० बी. बी. १७७७ ही ३० लाख रुपयांची आलिशान कार रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. रविवार दि. २ रोजी सकाळी कार चोरीची घटना लक्षात येताच मुर्तडक आणि वाटमारे यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत अज्ञात आरोपींविरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
थेट माजी महापौरांच्या घराबाहेरून आलिशान कार चोरल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. शासनाकडून नुकतेच पोलिसांना गस्त घालण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, वाहनचोरीच्या घटनांमुळे रात्रीची गस्त फक्त कागदावरच असल्याचे सिद्ध झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, गुन्हे शोध पथक हे शोभेचे बाहुले बनून राहिले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येत आहे. अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाजूला करून नव्याने गुन्हे शोध पथकाची निर्मिती करण्याचे आव्हान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. यावर अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





