पोलीस पहाऱ्यात उपचार घेणारा आरोपी खाजगी रुग्णालयातून फरार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पोलीस पहाऱ्यात उपचार घेणारा आरोपी खाजगी रुग्णालयातून फरार !


गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !
संशयिताच्या कुटुंबियांना ताब्यात घेत पोलिसांचे शोधकार्य सुरु !
नाशिक : गेल्या महिन्यात वाद झाल्याने एकाने दुसऱ्या विवाहितेसोबतचे व्हिडीओ, फोटो प्रेयसीस पाठवले. त्यामुळे प्रेयसी आणि प्रियकरामध्ये वाद झाल्याची घटना घडली. त्यातून प्रियकराने संतप्त होत मित्राच्या मदतीने प्रेयसीसोबत असलेल्या एका पुरुषावर प्राणघातक हल्ला केला. तर प्रेयसीसह दुसऱ्या विवाहितेने पुरुषासोबत मिळून प्रियकरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुंबई नाका येथील एका हॉटेलबाहेर घडली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी जीवे मारण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपी खाजगी रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली उपचार घेत असताना शनिवारी रात्री अचानक फरार झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस रात्रीपासून या संशयितांचा शोध घेत आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना देखील ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, दिवसपाळीत दोन आणि रात्रपाळीत दोन पोलीस कर्मचारी पहारा देत असताना देखील संशयित फरार झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
             याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार, दीपक कपिले व दत्ता आंधळे विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर दीपक कपिले याच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहित गोरडे याच्यासह दोन महिलांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. रविवार (दि.२५ मे) मुंबईनाका येथील एका हाॅटेलमध्ये दोन विवाहिता व एक पुरुष जेवण करीत होते. तिघे हॉटेलबाहेर आले. त्यावेळी तेथे आलेल्या संशयित दीपक कपिले व त्याचा जोडिदार दत्ता आंधळे यांनी दोन्ही महिलांसह त्यांच्यासोबत असलेल्या रोहित गोरडे यास शिवीगाळ करीत वाद घातला. यावेळी लाकडी दांड्याने दीपकने एका विवाहितेस मारहाण केली. त्यामुळे रोहितने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दीपकने त्यालाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत दांड्याने मारहाण केली. त्यामुळे महिलेने रोहितचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता दाेघा संशयितांनी तिलाही मारहाण केली. गर्दी जमल्याने दोघे संशयित तेथून निघून गेले. तर दीपकच्या फिर्यादीनुसार, प्रेयसीने फोन करून बोलवून घेत वाद घातला. त्यानंतर रोहित याने धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तसेच कानाला चावा घेत गंभीर दुखापत केली. त्यानंतर दोघी विवाहितांनी रोहितसह पळ काढला. याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीनुसार, रोहितसह दोन्ही विवाहितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
            या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी आणि संशयित दीपक संजय कपिले उर्फ डीके याच्यावर पंचवटी परिसरातील काट्या मारोती चौकातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्याच्यावर हल्ला करणारे आणि त्याचा साथीदार हे न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दीपक कपिले याने न्यायालयात त्याबाबतची पूर्तता देखील केली असून, त्यावर मंगळवार दि. १० रोजी सुनावणी होणार होती. मात्र, त्याच्या आतच संशयित कपिले याने रुग्णालयातून शनिवार दि. ७ रोजी पोलिसांच्या निगराणीतून पळ काढल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कपिले याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पत्नीसह इतर नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागलेला नाही.
संशयित दीपक कपिले पोलिसांच्या डोळ्यादेखत फरार झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ रात्रीच्या सुमारास कपिले याच्या रविवार कारंजा परिसरातील पिझाच्या दुकानावर जाऊन त्याची पत्नी आणि शालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच, पिझाची गाडी लावण्यास बंदी करीत एकप्रकारे त्यांच्या व्यवसायावर गदा आणण्याचे काम पोलिसांनी सुरु केल्याने याबाबत नातेवाईकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोटापाण्याचा व्यवसाय कुटुंबियांना पोलिसांनी करू द्यावा अशी आर्त हाक देखील कुटूंबियांनी दिली आहे. 
विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक संजय कपिले उर्फ डीके (३४, रा. रविवार कारंजा) याच्यासोबत ती आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. विवाहानंतरही विवाहिता व दीपकमध्ये भेटीगाठी होत होत्या. दरम्यान, ४ महिन्यांपासून विवाहिता दीपकसोबत बोलत नसल्याने दीपकने दुसऱ्या विवाहितेसोबतचे व्हिडीओ आणि फाेटो तक्रारदार विवाहितेस पाठवले होते. त्यानंतर तक्रारदार विवाहितेने माहेर गाठत दुसऱ्या विवाहितेचा शोध घेत दीपकला व्हिडीओ कॉल केला. तसेच दुसऱ्या विवाहितेकडे दीपकविरोधात तक्रार करीत आम्ही आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने दीपकने तक्रारदार प्रेयसीस शिवीगाळ केली. त्यानंतर दोघे पुन्हा बोलत होते. रविवारी दोन्ही विवाहिता रोहितसह हॉटेलमध्ये गेल्यानंतर दीपक सोबत पुन्हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. घटना घडल्यानंतर संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत साेडून दिले होते. मात्र मुंबईनाका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहित रंगनाथ गोरडे (३२, रा. सिडको), दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे (रा. दिंडोरी रोड) यांच्यासह इतर दोन संशयित महिलांना पकडून मुंबईनाका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

Translate »
error: Content is protected !!