शतपावली करणे दांपत्याला पडले महागात ! - CHECKMATE NEWS
क्राईम

शतपावली करणे दांपत्याला पडले महागात !


सतरा संशयितांचा नाशिककरांवर खतरा !

नाशिक : शहरातील सराईत सतरा चैन स्नॅचिंग करणारे संशयित तुरुंगाबाहेर आले असून त्यांनी आपला उच्छाद पुन्हा एकदा सुरु केला आहे. शहरात महिलांना एकटे फिरणे मुश्किल झाले होते. मात्र, आता जोडीदारासोबत फिरणे देखील अवघड झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री जेवणांनंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका दांपत्याच्या अंगावरील सोनसाखळी चोरटयांनी लंपास केली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
             गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत अनेक चैन स्नॅचिंग करणाऱ्या संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली होती. मात्र, काही महिने तुरुंगात काढल्यानंतर या सराईत गुन्हेगारांनी कायद्याचा आधार घेत न्यायालयातून जामीन मिळविण्यास सुरुवात केली होती. यामध्ये जानेवारी २०२४ ते जून २०२४ दरम्यान तुरुंगातून सतरा सराईत चैन स्नॅचिंग करणाऱ्या संशयित गुन्हेगारांनी जामीन मिळवला आहे. त्यामुळे या सतरा सराईतांचा खतरा आता नाशिककरांवर स्पष्ट दिसू लागला आहे. गेल्या आठवडाभरात शहरात अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहे. या का, कशा, कोणी केल्या हे नव्याने सांगायला नको. पूर्वी एकट्या दुकट्या महिलेला आपले शिकार केले जायचे मात्र, आता महिलेसोबत तिचा पती असला तरी चैन स्नॅचिंग करताना हे सराईत मागेपुढे बघत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे दिसत असून त्यांची पोलिसांबद्दल असलेली भीती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 
              रविवार दि. २१ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास चित्रा महेश वडनेरे, ४०, रा. ओम अपार्टमेंट फ्लॅट नंबर १२, कृष्ण नगर पंचवटी नाशिक या आपल्या पतीसोबत जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर ल्या होत्या. शतपावली करत नवजीवन हॉस्पिटल समोर असलेल्या जे. के. टायर्स तपोवन कॉर्नर, कृष्णनगर येथून जात असताना अचानक पाठीमागून काळ्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी चित्रा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचून मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव नाक्याच्या दिशेने पोबारा केला. या घटनेची माहिती घाबरलेल्या वडनेरे दांपत्याने तात्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात आजूबाजूला या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती कुठलेच धागेदोरे लागले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड करीत आहे. 

Translate »
error: Content is protected !!