खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश ! - CHECKMATE NEWS
क्राईम

खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश !


तिघा संशयितांना अटक ; शिवीगाळ केली म्हणून केला होता खून !

नाशिक : दीड महिन्यांपूर्वी बेवारस स्थितीमध्ये आढळल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. गंभीर मारहाण करत खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पंचवटी परिसरातील कोशिरे मळ्यात फेकण्यात आला असल्याची माहिती संशयितांनी दिली आहे. या खून प्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे शवविच्छेदन अहवालात खून झाला नसल्याचे स्पष्ट असताना देखील पोलिसांनी खोलवर तपास करत पुरावा नष्ट करणाऱ्या मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. 

            पंचवटी परिसरातील रामवाडी येथील कोशिरे मळ्याजवळ ३१ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास पंढरीनाथ उर्फ पंड्या रघुनाथ गायकवाड यांचा मृतदेह मिळून आला होता. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत पंढरीनाथ गायकवाड यांच्या मृत्यूबाबत पोलिसांना संशय असल्याने हा खून असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवून त्या दिशेने आपला तपस सुरु केला होता. दरम्यान बुधवार दि. ९ रोजी गुन्हे शाखा युनिट एक मधील पोलीस अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना संशयित सुनील गायकवाड उर्फ गटऱ्या आणि त्याचा चुलत भाऊ यांनी एकाला बेदम मारहाण करून जिबे ठार मारल्याची माहिती मिळाली होती. तसेच, संशयित हे सिद्धार्थ नगर झोपडपट्टी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. 
           मिळालेल्या माहितीच्या आधारे सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथे सापळा रचून संशयित सुनील नागू गायकवाड उर्फ गटऱ्या विकास संतोष गायकवाड दोघे रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी याना ताब्यात घेतले. त्याब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी संशयित गटऱ्या याला पंढरीनाथ गायकवाड याने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी विकास गायकवाड आणि साहिल संजय शिंदे यांनी रिक्षातून मयत पंढरीनाथ गायकवाड यांचा मृतदेह रामवाडी परिसरात टाकल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी गटऱ्या यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहे. तसेच, मयत पंढरीनाथ गायकवाड याच्यावर देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
            ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रवींद्र आढाव, महेश साळुंके, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जागेश्वर बोरसे, समाधान पवार, नाझीमखान पठाण यांनी केली आहे.  
मयत पंढरीनाथ गायकवाड यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यू निमोनियाने झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, तरीही युनिट एकच्या पथकाने या मृतदेहाबाबत चौकशी सुरु केली होती. याचदरम्यान मयत आणि संशयितांमध्ये एक दीड महिन्यांपूर्वी भांडण झाले असल्याची कुणकुण पोलिसांना मिळाली आणि त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. या खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने झालेला घटनाक्रम पोलिसांसमोर सांगितला आणि या खुनाच्या घटनेची उकल झाली.  

Translate »
error: Content is protected !!