नाशिकच्या शिरपेचात भव्य श्रीराम शिल्पाच्या रूपाने मानाचा तुरा !
आज होणार भव्य अशा श्रीरामांच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा !
नाशिक : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून रोवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा श्रीरामांच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. ११ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पंचवटी परिसरातील तपोवन येथील रामसृष्टी उद्यानात करण्यात येणार आहे. हा लोकार्पण सोहळा प्रमुख उद्घाटक वैश्विक सदस्य इस्कॉन संस्था गौरांग स्वामी (इस्कॉन), उद्घाटन वक्ते विख्यात अर्थतज्ज्ञ आणि श्री गुरुजी रुग्नालयाचे अध्यक्ष डॉ. विनायकराव गोविलकर यांच्या हस्ते होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्व नाशिककरांनी आणि श्रीराम भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केले आहे.
नाशिकची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. प्रभू श्रीरामांनी वनवास काळात अनेक वर्षे नाशिकच्या तपोवनात व्यतीत केलेले आहे. याच तपोवनाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या पाठपुराव्याने पर्यटन विभागाच्या माध्यमातून तपोवन परिसरातील रामसृष्टी उद्यानात महाराष्ट्रातील सर्वात भव्यदिव्य असा श्रीरामांचे शिल्प उभारण्यात आले आहे. या भव्य दिव्य शिल्पामुळे तपोवनाचा वनवास संपून पर्यटनाचे केंद्र तपोवन बनणार असल्याची भावना भाविक आणि नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.
श्रीरामाचे वनवास काळातील वास्तव्य तर दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेल्या तपोवन परिसरात पूर्णकृती श्रीरामांचे शिल्प असावे अशी संकल्पना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या मनात आली. यावर त्यांनी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे प्रस्ताव पाठवत पाठपुरावा केला आणि त्यास मंजुरी मिळवून घेतली. या करिता राज्य सरकारकडून ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले. या निधीत शिल्प, चौथरा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या पूर्णकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. ११ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पार पडणार असून नागरिकांना दर्शनासाठी तो खुले केले जाणार आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी सण असल्याने सुट्ट्यांमध्ये राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून पर्यटक शहरात येत असतात. हेच डोळ्यासमोर ठेवून या शिल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना भव्य अशा श्रीरामांच्या भव्यदिव्य अशा शिल्पाचे दर्शन होणार आहे. तपोवनात उभारण्यात आलेल्या या श्रीरामांच्या शिल्पामुळे परिसरात स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, तर पर्यटन विकासामुळे शहरातील अर्थचक्र फिरण्यास मदत होईल यात शंका नाही.
श्रीरामांचे शिल्प उभारताना फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर या मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे. धातूंच्या मूर्तीवर होणाऱ्या ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार करून या मूर्तीमध्ये फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नसून हे अधिक टिकाऊ असणार आहे. सदरचे काम बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपअभियंता अविनाश देवरे आणि शाखा अभियंता मयूर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने श्रीरामांचे शिल्प उभारताना अनेक बदल करण्यात आले आहे. चौथऱ्याच्या पायापासून आरसीसीमध्ये कॉलम व बिमचे स्ट्रक्चर तयार करून त्यावर पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अंतर्गत आरसीसी बांधकामामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडणार नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर दीपक कुलकर्णी हे स्ट्रक्चरल डिझायनर असून त्यांनी याचे परीक्षण केले आहे.
मटेरियल : फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर (एफआरपी), श्रीरामांच्या मूर्तीची उंची : ६१ फूट (चार भागांमध्ये मूर्ती आणण्यात आली असून नाशिकमध्ये जोडण्यात आली आहे.), चौथरा : १५ फूट, भव्य असा भगवा ध्वज लावण्यासाठी पुतळ्यापेक्षा मोठा ध्वजस्तंभ, श्रीरामांच्या पुतळ्याभोवती संगीत कारंजे, सजावटीचे दिवे, आणि आकर्षक विद्युत रोषणाई, कालावधी : सहा महिने, ठेकेदार : मॉडेल आर्ट वर्क्स, छत्रपती संभाजी नगर हे असून वास्तुविशारद धीरज पाटील आहे. या पुतळ्याचे विविध भाग हे चेन्नई, पुणे नागपूर येथे बनविण्यात आले आहे.
भक्तांच्या भावना आणि ऐतिहासिक महत्व असल्याने व्यक्तिरेखा चुकायला नको म्हणून श्रीरामांची ६१ फुट उंचीचा पुतळा उभारण्या अगोदर त्याचे १० फूट उंचीचे मॉडेल बनविण्यात आले. चेन्नई, पुणे आणि नागपूर या ठिकाणाहून सीएनसी मशीनच्या माध्यमातून हुबेहूब मूर्तीचे विविध भाग एन्लार्ज करत चार भागांमध्ये काम पूर्ण करण्यात आले. हे सर्व भाग नाशिकमध्ये आणून त्यानंतर ते जोडण्यात येऊन उभारणी करण्यात आली.
श्रीरामांचे वास्तव्य असलेल्या तपोवनात भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणावे तसे काहीच नव्हते. भाविकांच्या आस्थेचा विचार करून श्रीरामांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला. श्रीरामांचे तपोवनातील वास्तव्य आणि कुंभमेळा या धर्तीवर पर्यटनाला चालना मिळावी हा देखील यामागील उदात्त हेतू आहे. हा पुतळा बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून अर्थचक्र फिरण्यास मदत होईल. :ॲड. राहुल ढिकले (आमदार, पूर्व विधानसभा)





ॲड. राहुल ढिकले (आमदार, पूर्व विधानसभा)