पेठच्या अवैध चेकपोस्टवर व्हिजिलन्स पथकाने काय तपासणी केली ?
व्हिजिलन्स पथक जाताच लाचखोर आरटीओला अटक !व्हिजिलन्स पथक देखील वसुलीत सामील असल्याचा आरोप !
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर आरटीओ अधिकाऱ्याला आपल्या दोन खासगी सहकाऱ्यांसह पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागातील व्हिजिलन्सचे पथक याठिकाणी छापा पडण्याअगोदर तपासणी करून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नेमके व्हिजिलन्सच्या पथकाने या अवैध चेकपोस्ट नेमकी कशाची तपासणी केली आणि त्यांना हि बेकायदेशीर होणारी पठाणी वसुली दिसली नाही का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. कि यामागे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासले गेले आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे. यावर परिवहन आयुक्त चौकशी करून कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच चेकपोस्टवर कसा कारभार चालू आहे. हे तपासणी करण्याचे काम सुरु असते. यासाठी स्पेशल व्हिजिलन्सचे पथक तयार करून त्यांना चेकपोस्टवर सुरु असलेल्या कामावर लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या असतात. तसेच, कामकाजात काही कसून आढळून आल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार दिलेले असतात. मात्र, हेच व्हिजिलन्स पथक सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्याच कार्यक्षमतेवर नागरिक आणि वाहनधारकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण पथकाकडून तपासणी केल्याचा दिखावा केल्यानंतर काही वेळातच आरटीओ अधिकाऱ्याला खासगी नागरिकांसह लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
गुरुवार दि. २० रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथून गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीची बस जात होती. यावेळी पेठ चेकपोस्ट येथे बस अडवून संशयित लोकसेवक मोटार वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे, ४९ हे त्यांच्या कक्षात हजर असताना खासगी नागरिक संशयित विनोद अर्जुन साळवे, ४७ आणि मनोहर सुनील निकम २७ यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी (कंपाउंड फी) इ चलनासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करून पाचशे रुपये घेताना या बसमध्ये प्रवासी आणि क्लिनर बनून आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरटीओ आधिकाऱ्यासह तिघांना रंगेहात अटक केली होती. विशेष म्हणजे हि घटना होण्याअगोदर काही वेळापूर्वीच परिवहन आयुक्त कार्यालयातील व्हिजिलन्सच्या पथकाने या ठिकाणी तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे या व्हिजिलन्सच्या पथकाने काय तपासणी केली होती. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर परिवहन आयुक्त काय कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हिजिलन्स पथक येणार असल्यास त्याची माहिती संबंधित ठिकाणी पहिलेच पुरवली जाते. त्यानंतर पथकाची तपासणी होईपर्यंत अवैध वसुली बंद ठेवण्यात येते. पथकाकडून तपासणीचे कायदेशीर सोपस्कार पार पाडले जातात. त्यानंतर संबंधित चेकपोस्टवर असलेल्या अधिकाऱ्याकडून पथकाचा योग्य असा पाहुणचार केला जातो. तसेच, त्यांना बिदागी देखील दिली जात असल्याने या पथकाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. कारण स्थानिकांसह अनेक राजकीय पक्षांनी या अवैध चेकपोस्ट विरोधात आवाज उठवून देखील हा बेकायदेशीर चेकपोस्ट बंद केला जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे या अवैध वसुली मध्ये स्थानिक आरटीओ कार्यालयापासून वरपर्यंत म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालयातील सर्वांचेच लागेबांधे असल्याचा प्रकार उघड होत आहे.





