राज्यस्तरीय भीष्मराज मेमोरियल शुटिंग स्पर्धेस प्रारंभ !
नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटनेच्या वतीने भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र एअरगन स्पर्धेला मंगळवारी (दि. २३) प्रारंभ झाला. ही स्पर्धा जिल्हा नेमबाजी संघटनेतर्फे महाराष्ट्र रायफल असोसिएशन अंतर्गत भीष्मराज मेमोरियल शुटिंग रेंज सातपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त हर्षद आराधी हे उपस्थित होते.
जिल्हा नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पारख, खजिनदार आरती झोंबाड यांनी पाहुण्यांना डॉ.भीष्मराज बाम यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटनेच्या सचिव श्रद्धा नालमवार यांनी केले. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेचारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही राज्यस्तरीय पात्रता फेरी असणार आहे. यातील विजयी खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. ही स्पर्धा युथ, सब युथ, सीनियर वेगवेगळ्या गटात घेतली जाणार असून, त्यासाठी विविध पारितोषिके देखील जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा संघटनेच्या सचिव श्रद्धा नालमवार यांनी दिली.





