कर्मचाऱ्याच्या स्टेटसमुळे “हिऱ्या” सारख्या शिक्षण संस्थेच्या स्टेटसवर संशय !
शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न !
शिक्षण संस्थेच्या महिला संचालकाकडून छळ होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न !
मुलाला रंग घेऊन द्यायला देखील पैसे नसल्याने नैराश्य ; शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ !
नाशिक : राजकारणाचा मोठा वारसा लाभलेल्या नाशिकमधील शिक्षण क्षेत्रात कायम हिऱ्यासारखी चमक असणाऱ्या अशा नामांकित शिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचे वृत्त व्हायरल झाले. आणि शैक्षणिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या स्टेटसमध्ये संस्था चालकांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, संस्था चालकांच्या घरातील ताईसाहेब देखील फक्त “स्मित” हास्य करून तुझी ऑर्डर लवकरच निघणार असल्याचे सांगत असल्याचा आरोप या सुसाईड स्टेटस नोट मध्ये करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. विशेष करून संस्था चालकांच्या घरातील महिलांना लक्ष करण्यात आल्याने हे गांभीर्य प्रत्येकानेच अधिक गंभीरपणे घ्यायला हवे. या घटनेमुळे शिक्षण संस्थेच्या घशात स्वतःचे “दंत” गेले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
यामध्ये ज्या अहिरे नामक कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या स्टेट्समध्ये लिहिले आहे की, संबंधित शिक्षण संस्थेत आपण १८ वर्षांपासून कार्यरत असून, १८ हजार पगार आहे. या १८ वर्षात माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. माझ्या मागून आलेल्या लोकांना तिप्पट पगार आहे. मला संस्था चालकांच्या बंगल्यावर ३६५ दिवस काम करावे लागत आहे. सुट्टी मागितली तर खालच्या थराची वागणूक दिली जाते. अल्पशा पगारात प्रपंच चालत नसल्याने सोने-नाणे गहाण ठेवून प्रपंच सुरु आहे. पगार कमी असल्याने मुलाची शाळेची फी भरली गेली नसल्याने शाळेवाले रोज तगादा लावत आहेत. सहा महिन्यांपासून घराचे मेंटेनंस, लाईट बिल, शाळेच्या गाडीचे भाडे आणि क्लासची फी थकली आहे. रंगपंचमीला मुलगा रंग घेऊन देण्यासाठी रडत होता. मात्र, रंग घेऊन देण्यासाठी माझी लायकी राहिली नसल्याने मी आपले जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे. तसेच, संस्था चालकांकडे पगार मागितल्यास काम करायचं तर कर नाहीतर निघून जा असे सांगितले जात आहे. या शिक्षण संस्था चालकांच्या परिवाराने मला बरबाद केले आहे. यांच्यामुळे आपल्याला दारूचे व्यसन जडले आहे. आपल्यावर झालेल्या कर्जाला संस्था चालकांचा परिवार जबाबदार असून कृपया यांना सोडू नका यांना अद्दल घडवा असे स्टेट्स ठेवून या कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पीडित कर्मचाऱ्याच्या व्हाट्सऍप स्टेटस मुळे या शिक्षण संस्थेच्या हिऱ्या सारख्या स्टेटसवर संशय निर्माण करणाऱ्या चर्चा सुरु झाल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास आवश्यक ठरतो.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून अल्प पगारात वेठबिगारी प्रमाणे घरकामे देखील करून घेतली जात असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये संस्था चालक पुरुषांपप्रमाणे महिला देखील मागे राहिल्या नसल्याचे कर्मचाऱ्याने ठेवलेल्या स्टेटस मध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणात खरी बाजू कुणाची आहे हे समोर येणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच तपास होणे गरजेचे ठरते. नेहमीप्रमाणे या कर्मचाऱ्यावर संस्था चालकांकडून दबाव टाकून किंवा कायमस्वरूपी नोकरीचे प्रलोभन दाखवून हे प्रकरण रफादफा केले जाणार अशी शंका नंतरच्या घडामोडीतून येऊ लागली आहे. त्यामुळे यात किमान पोलीस प्रशासनाने आपली प्रामाणिक भूमिका बजावल्यास आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर येऊन दोषी संस्था चालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. यातून एक चांगला संदेश समाजामध्ये जाण्यास मदत होईल. कुणी फिर्यादी नाही ही सबब किमान या प्रकरणात पुढे येऊ नये, अन्यथा पोलिस यंत्रणेवर उरलेला विश्वासही नष्ट होईल.





