पोलिसांना लागले भाईगिरीचे डोहाळे ?
शहरभर पोलीस कर्मचाऱ्याचे शुभेच्छा फलक आणि वेटरवर रीव्हॉल्व्हर ताणल्याची जिल्ह्यात चर्चा !पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट !

नाशिक : महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था डागाळली गेल्याने एकीकडे गृह विभाग आणि पोलीस दल आपली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आपल्या पोलीस दलाची लक्तरे वेशीला टांगताना दिसत आहे. एक पोलीस कर्मचारी थेट शुभेच्छा फलकांवर शहरभर झळकत असताना दुसरीकडे एका पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेलमधील वेटर वर थेट सरकारी रिव्हॉल्वर ताणून जीवे मारण्याची धमकी दिल्याने रक्षकच भक्षक झाले असल्याचे दुर्दैवी चित्र पोलीस दलात दिसू लागले आहे. जणूकाही नाशिकमधील पोलीस कर्मचाऱ्यांना भाई बनण्याचे डोहाळे लागले आहे का असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. अशा बेजबाबदार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस दल टीकेचे धनी झाले आहे. यासाठी आपली मान उंचावण्यासाठी पोलीस दल प्रयत्न करीत आहे. मात्र, नाशिकच्या पोलिसांना त्याचे कुठलेही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसारखे समाजासमोर वावरू लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण पोलीस दलातील आणि सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो शहरभर लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर झळकले होते. या फलकांवर शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये काही रेकॉर्डवरील संशयित असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यामुळे अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत आपली छबी झळकावून संपूर्ण पोलीस दलाच्या छबीला काळिमा पुसल्याची चर्चा देखील शहरभर सुरु आहे.
शुभेच्छा देणाऱ्या पोलिसांची चर्चा थांबत नाही तोच नाशिकरोड येथे एका पोलिसाने थेट वेटरवर बंदूक ताणल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. १० रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अंमलदार विशाल झगडे हा आपल्या दोन साथीदारांसह नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथील हॉटेल रामकृष्ण येथे जेवण करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने हॉटेलमधील वेटर सीरॉन शेख यास बोलाविले. त्यावेळी बोलताना संशयित झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असता, संशयित झगडे याने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे भयभीत झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाने सागर निंबा पाटील, २७, रा. आगर टाकळी रोड, उपनगर, नाशिक यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठत पोलीस अंमलदार विशाल झगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल रामकृष्णमध्ये संशयित पोलीस झगडे याने वेटरवर रिव्हॉल्व्हर ताणत असल्याचा सर्व प्रकार येते लावण्यात आलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारांची पायेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली आहे.. यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील अवैध धंदे उध्वस्त करण्यात येत आहे. गावठी दारू आमी गुटखा माफियांचे जगणे मुश्किल केले आहे. असे असताना दुसरीकडे मात्र, रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत पोलीस कर्मचाऱ्याची फलकबाजी आणि वेटरवर सरकारी रिव्हॉल्वर ताणत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या इभ्रतीचे चांगलेच धिंडवडे निघाले आहे. चौकाचौकात या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचे किस्से चर्चिले जाऊ लागले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





