मध्यरात्री रंगला गांजा तस्कर आणि पोलिसांमध्ये थरार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

मध्यरात्री रंगला गांजा तस्कर आणि पोलिसांमध्ये थरार !


दाक्षिणात्य फिल्मसारखा थरार अनुभवला नाशिककरांनी !

२५ किलोमीटर पाठलाग करून संशयितासह पकडला गांजा ! 

 

नाशिक : मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई महामार्गावर अचानक एकामागोमाग एक अशा पद्धतीने शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांची वाहने सायरन वाजवत एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करतात. यावेळी रात्रीच्या सुमारास महामार्गावर धावणाऱ्या इतर वाहन धारकांना नेमके काय चालले आहे किंवा एखाद्या फिल्मची शूटिंग चालली असावी असा भास व्हावा अशा खतरनाक पद्धतीने नाशिक पोलीस एका संशयित वाहनाला पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता महामार्गावर सुसाट वेगाने धावत होते. पहिले एक पोलीस वाहन पाठलाग करीत होते. मात्र, काही कळायच्या आत या महामार्गावर पोलिसांची आठ वाहने या संशयित वाहनाला पकडण्यासाठी शर्थीची झुंज करताना बघायला मिळाले. हा सर्व थरार एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. यामुळे नाशिकच्या पोलिसांची झुंजार कामगिरी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवायला मिळाली आहे. 

दाक्षिणात्य फिल्ममध्ये ज्या पद्धतीने खलनायकाचा पाठलाग करून पोलीस त्याला जेरबंद करतात त्याच फिल्मी स्टाईलने नाशिकच्या आडगाव पोलिसांसह शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी एका भरधाव कारचा पाठलाग करून त्यातील संशयित आरोपीला वाहनातील गांजा या अंमली पदार्थासह पकडले आहे. याबाबत पोलिसांनी एका संशयिताला बेड्या ठोकल्या असून त्याच्या इतर फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई बद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. अटक केल्या संशयीताकडून वाहनासह ८ लाख ७९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याच्या इतर चार फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली दिलेली माहिती अशी की, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सध्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप ॲण्ड सर्च कारवाई सुरु आहे. यामध्ये सस्त्यावर वाहने थांबवून अचानक तपासणी केली जाते. मंगळवार दि. ७ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाणे हद्दीत नववा मैल येथे आडगाव सी.आर. मोबाईलचे अंमलदार पोशि बाळकृष्ण पवार आणि पोहवा भाऊराव गांगुर्डे हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते. यावेळी एक लाल रंगाचे वाहन मारुती एस. एक्स. ०४ क्रमांक एम. एच. ०२ जे. पी. ०१२३ वरील चालकांने वाहन न थांबवता स्टॉप ॲण्ड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखत पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. यावेळी भाऊराव गांगुर्डे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देवुन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली. यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या आरटीपीसी सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देवून मदतीस पाठविले. यावेळी मदतीसाठी आडगाव डीबी मोबाईल, आडगाव पिटर मोबाईल, पर्यवेक्षक -१ कर्तव्यावरील म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, चेकींग कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक युवराज पत्की, मुंबई नाका डीबी मोबाईल, भद्रकाली पिटर मोबाईल, पंचवटी डीबी तसेच रात्रगस्त कर्तव्यावरील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव अशा ८ वाहनांनी या संशयीत वाहनाचा चित्तथरारक पाठलाग सुरू केला.

संशयीत वाहनाचा हा पाठलाग मध्यरात्री दोन वाजेपासून सुरू करण्यात आला होता. वाहनाचा पाठलाग नववा मैल ते द्वारका, द्वारका ते यु टर्न अमृतधाम, अमृतधाम यु टर्न ते के.के. वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदीर पर्यंत असा सुमारे २५ किमी सतत पाठशिवणीचा खेळ सुरु होता. २ ते ३ तास सतत २५ किमी अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयीत वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलास यश आले. या पाठलागा दरम्यान संशयित आरोपीने पोलीसांच्या ४ वाहनांना धडक देवुन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र, पाच पैकी चार संशयित अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ५ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा २८ किलो गांजा आढळून आला. तसेच संशयित आरोपी आकाश गणेश डोळस, ३६, रा. करंजाडे, ता. पनवेल, जि. रायगड याला अटक केली असून, त्याचे साथीदार राजू धोत्रे, प्रशांत सोनकांबळे, भोंद्या आणि संतोष दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही. यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.


Translate »
error: Content is protected !!