रक्तरंजीत रंगपंचमीने नाशिक हादरले !
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा भावांची निर्घृण हत्या !शहरातील कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर !शहरात गुन्हेगारांचे साम्राज्य असण्यावर शिक्कामोर्तब !
नाशिक : नाशिक शहर परिसर गुन्हेगारांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र सध्याच्या सुरु असलेल्या खूनाच्या मालिकेवरून दिसून येत आहे. एकीकडे गुन्हेगारांनी शहराला वेठीस धरलेले असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन आपल्या वेगळ्याच दुनियेत मस्त दिसत आहे. गंभीर गुन्हे घडल्यानंतर संशयितांना पकडून आणणे याला सध्या पोलिसिंग असल्याचे मानले जात असावे असे पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून दिसून येत आहे. याच ढिसाळपणाचा फायदा घेत एका टोळक्याने घराबाहेर दोघ्या सख्या भावांवर रंगपंचमीच्या दिवशी प्राणघातक हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे रंगपंचमी सणाला गालबोट लागले आहे.
शहर आयुक्तालयात रस्त्यावरील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही अशी एकंदरीत परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात दोघा भावांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने उपनगर परिसरासह शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकर वाडी, बोधले नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव, ३२ आणि प्रशांत भगवान जाधव ३० या दोघा भावांची संशयित सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व रा. आंबेडकर वाडी, नाशिकरोड यांनी पूर्व वैमन्यासातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणून बुधवार दि. १९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलिसांची चार पथके त्यांचा शोध घेत आहे.
हत्या झाल्याचे समजताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तसेच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून दोघा भावांचे मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे. भर वस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश राहिला नसल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागणार का ? आणि खुनाच्या या घटनेनंतर तरी पोलीस शहराची शांतता अबाधित ठेवण्याकरिता ॲक्शन मोडवर येतील का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जाधव बंधूंच्या हत्याकांडातील संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळींब मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून युनिट एकच्या पथकाने संशयित आरोपी सागर मधुकर गरड, ३२, रा. आंबेडकरवाडी उपनगर नाशिक, अनिल विष्णु रेडेकर, ४०, रा. उत्तरानगर पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड नाशिक, सचिन विष्णु रेडेकर, ४४, रा. गायत्री नगर, पुनारोड नाशिक, अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे, २६, रा. सर्वेश्वर चौक, नविन सिडको उत्तमनगर, नाशिक, योगेश चंद्रकांत रोकडे, ३०, रा. आंबेडकर वाडी, उपनगर नाशिक यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
शहर पोलीस दलात सध्या अनेक कर्तृत्वान आणि सक्षम असे पोलीस अधिकारी आहे. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील काही विशेष पोलीस अधिकाऱ्यांवर मेहेर नजर ठेवली आहे. पंचवटी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट एकचा पदभार मधुकर कड यांच्याकडे दिलेला आहे. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना देखील गुन्हे शाखा युनिट दोनचा कारभार सहायक पोलीस निरीक्षकांच्या भरोश्यावर सोडण्यात आला आहे. त्यामुळे मोजक्याच अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता तरी पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सक्षम अधिकाऱ्यांच्या हाती पोलीस ठाण्यांचा आणि गुन्हे शाखेचा कारभार देणे गरजेचे असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.






