पेठ चेकपोस्ट येथे लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्यासह तिघांना अटक !
आरटीओचा बेकायदेशीर पेठ चेकपोस्ट पुन्हा एकदा चर्चेत !छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कायम चर्चेत राहिलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पेठ चेकपोस्ट येथे छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एका आरटीओ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या पठाणी वसुलीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. या आरटीओ अधिकाऱ्यासह दोन खासगी नागरिकांना देखील पथकाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.
याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून, ते नागरिकांसाठी सहलीचे आयोजन करीत असतात. गुरुवार दि. २० रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथून गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने जात होते. यावेळी पेठ चेकपोस्ट येथे बस अडवून संशयित लोकसेवक मोटार वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे, ४९ हे त्यांच्या कक्षात हजर असताना खासगी नागरिक संशयित विनोद अर्जुन साळवे, ४७ आणि मनोहर सुनील निकम २७ यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी (कंपाउंड फी) इ चलनासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून पाचशे रुपये घेतले. तसेच, यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पंच यांना चेक पॉईंट कक्षात प्रवेश करण्यास अटकाव केला होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पथकाने नितीन अहिरे यांच्याकडून एक महागडा मोबाईल फोन जप्त केला आहे.
हि कारवाई सापळा अधिकारी छत्रपती संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे, पोह. जिवडे, राजेंद्र जोशी, पो. अं. विलास चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. हा गुन्हा नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पूर्वी आरटीओचा हा बेकायदेशीर चेकपोस्ट पेठ शिवारातील खडकाचा पाडा शनिमंदिर येथे होता. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी स्थानिक नागरिकांनी या चेकपोस्टला विरोध करीत गोंधळ घातला होता. याबाबत पोलीस ठाण्यात काही स्थानिकांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने हा चेकपोस्ट येथून हलवत पुढे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या राजबारी येथे जवळपास ९ किलिमीटरपुढे घेऊन गेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
पेठ चेकपोस्टवरील वसुलीबाबत छत्रपती संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार मिळाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने एक पथक तयार करून हे पथक छत्रपती संभाजी नगर येथून बसमध्ये प्रवास करीत पेठ चेकपोस्ट येथे आले होते. त्यानंतर दोन हजार रुपयांची मागणी पेठे चेकपोस्ट येथे करण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी तडजोड करीत पाचशे रुपये देण्याचे ठरवले. आणि हे पाचशे रुपये देताना सापळा रंगेहात यशस्वी करण्यात आला.
प्रादेशिक परिवहन विभागात पेठ चेकपोस्टला कुठेही कायदेशीर आणि कागदोपत्री मान्यता नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. तरी देखील याठिकाणी आलिशान कॅबिन बांधण्यात आली आहे. तसेच, येथे आरटीओ अधिकाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जर चेकपोस्ट अनाधिकृत आहे. तर याठिकाणी पक्के बांधकाम करून कॅबिन उभारण्याची गरज काय असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पेठ चेकपोस्ट येथील बेकायदेशीर पठाणी वसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.





