दोन तोळे सोन्याच्या सौभाग्य लेण्यावर चोरट्यांचा डल्ला ! - CHECKMATE NEWS
क्राईम

दोन तोळे सोन्याच्या सौभाग्य लेण्यावर चोरट्यांचा डल्ला !


पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !
नाशिक : पंचवटी परिसरातील बाप्पा सीताराम रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग करणाऱ्यांची दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस हवालदाराच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारे चोरटे अद्याप जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांना यश आलेले नाही. त्यात पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग झाल्याने महिला वर्गात एकच दहशत पसरली आहे. 
             कीर्ती प्रशांत भंगाळे,४८, रा. प्लॉट नंबर १३, प्रथमेश कम्प्युटर्स, गोपाळ नगर अमृतधाम पंचवटी नाशिक या शुक्रवार दि. ३० रोजी संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या सुमारास विजयनगर कॉलनीशेजारील बाप्पा सीताराम रोडवरून जात असताना अचानक काळ्या कलरच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा दुचाकीस्वारांनी कीर्ती भंगाळे यांना काही कळायच्या आत त्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन खेचून पोबारा केला. या घटनेमुळे भेदरलेल्या कीर्ती यांनी घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चैन स्नॅचिंग करणाऱ्या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 
              दिवसाढवळ्या झालेल्या या चैन स्नॅचिंगच्या घटनेमुळे पुन्हा एकदा पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी देखील अनेकदा या परिसरात चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहे. मात्र, त्यावर कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 
गेल्या काही महिन्यांपूर्वी श्रीराम आणि गरुड रथोत्सवादरम्यान जवळपास २० महिलांच्या गळ्यातील तीन लाखांचे सोने चोरटयांनी लंपास केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंग होत असताना पोलीस मात्र, सुस्त असल्याचे दिसत आहे. अद्याप पर्यंत एकही चैन स्नेचर किंवा हात चलाखीने गळ्यातील दागिने चोरणारे चोरटे सापडले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहे. 
पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दीपक नाईक यांच्या पत्नी हेमा दीपक नाईक, ४४ रा. जाई बंगला, जोशी वाडा हनुमान मंदिराजवळ, हिरावाडी या गुरुवार दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास योगा करण्यासाठी शक्तीनगर परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला होता. या घटनेला एक महिना उलटून देखील पोलिसांच्या हाती अद्याप सोनसाखळी चोरांचा कुठलाही सुगावा लागलेला नाही.  

Translate »
error: Content is protected !!