सिन्नर फाटा येथील खुनातील संशयित जेरबंद ! - CHECKMATE NEWS
क्राईम

सिन्नर फाटा येथील खुनातील संशयित जेरबंद !


जुन्या भांडणाच्या वादातून खून केल्याचे उघड !
नाशिक : शुक्रवारी नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथे एका युवकाची डोक्यात लोखंडी रोड मारून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या हत्येतील संशयिताला गुन्हे शाखा एकच्या पथकाने वडाळा गावातील राजवाडा येथून शिताफीने ताब्यात घेत जेरबंद केले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून खून केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
            शुक्रवार दि. २ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास प्रमोद केरुजी वाघ, ४०, रा, चेहडी शिव परिसर हे नाशिक-पुणे महामार्गावरील सर्विस रोडवरील लक्ष्मी दर्शन टॉवर येथील यश टायर या दुकानाबाहेर आपल्या दुचाकी वर बसलेले असताना दोघा संशयितांसोबत बाचाबाची होऊन वाद झाला. यावेळी दोघा संशयितांपैकी एका हल्लेखोराने दुकानासमोर पडलेला लोखंडी रॉडने हल्ला करून प्रमोद वाघ यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर संशयित दुचाकीवरून फरार झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली होती. या हत्येबाबत मयत प्रमोद वाघ यांचा आतेभाऊ ऋतिक रमेश पगारे,२४, रा. लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडी शिव नाशिकरोड, नाशिक यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 
          दरम्यान या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला होता. गुन्हे शाखा युनिट एकमधील कर्मचारी विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त माहिती मिळाली की, हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सद्दाम मलिक हा वडाळागाव भागात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, पोना विशाल देवरे, चापोअं समाधान पवार यांनी वडाळागाव परिसरात संशयितांचा अहोरात्र भर पावसात शोध घेतला. मात्र, संशयित आरोपी हा वेष बदलून नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळागाव, मुंबईनाका, नानावली परिसरात फिरत होता. 
             शेवटी वडाळागावातील राजवाडा परिसरात असल्याची खात्रीशिर माहिती मिळताच पथकाने संशयित  सद्दाम सलिम मलिक, ३३, रा. मंदिकीनी चाळ, अरांगळे मळा, एकलहरारोड, नाशिकरोड, नाशिक याला ताब्यात घेत जेरबंद केले. आल्यावेळी संशयित सद्दाम याने आपला साथीदार संशयित योगेश पगारे, रा. चेहडी याच्या मदतीने जुन्या वादाची कुरापत काढुन प्रमोद वाघ याची हत्या केल्याची कबुली दिली. संशयित मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

Translate »
error: Content is protected !!