श्री. कपालेश्वर चरणी सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण !
पारदर्शकतेमुळे देणगीमध्ये मोठी वाढ !श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाट परिसरात वाहनांना बंदी !
नाशिक : नाशिक मधील जगप्रसिद्ध असलेल्या श्री कपालेश्वर महादेवाच्या चरणी एका भक्ताने सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. या भक्ताने आपले नाव गुपित ठेवण्याची विनंती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. या मुकुटाची विधिवत पूजा करून कपालेश्वराला परिधान करण्यात आला तसेच, पालखी मिरवणुकीमध्ये असलेल्या पंचमुखी मुखवट्याला देखील हा मुकुट घालण्यात आला होता.

पंचवटी परिसरातील रामकुंडासमोर असलेल्या टेकडीवर जगातील एकमेव असे नंदी नसलेले भगवान श्री कपालेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. स्वयंभू महादेव मंदिर असल्याने आणि याठिकाणी भक्तांचे नवस पूर्ण होत असल्याने या मंदिरात दररोज हजारो भाविकांची मांदियाळी बघायला मिळते. रात्री उशिरापर्यंत देखील या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.
श्री कपालेश्वराच्या चरणी एका भक्ताने आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून सोन्याचा मुलामा चढविलेला ८९७ ग्रॅम चांदीचा मुकुट कपालेश्वराच्या चरणी अर्पण केला आहे. या भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना केल्यामुळे विश्वस्तांनी या भक्ताचे नाव गुप्त ठेवले आहे. श्री कपालेश्वराला मिळालेल्या मुकुटाची विधिवत पूजा करून महादेवाच्या लिंगावर हा मुकुट चढविण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीतील चांदीच्या मुखवट्याला देखील हा मुकुट घालण्यात आला होता. यावेळी हा मुकुट बघण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
सोमवार दि. ५ रोजी पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त रामकुंड परिसरात भाविकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मालेगाव स्टॅन्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, शनि चौक, सरदार चौक या ठिकाणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. याठिकाणाहून पहाटे चार वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी आपापली वाहने वरील मार्गाने घेऊन न येता ते जुने भाजी मार्केट पटांगण, म्हसोबा पटांगण, यशवंतराव महाराज समाधी मंदिराजवळील पटांगण या ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहने पार्किंग करून मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन पंचवटी पोलिसांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरातील देणगीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला जात होता. मात्र, विश्वस्त मंडळ कार्यरत झाल्यानंतर आम्ही भाविकांमध्ये जनजागृती करून देणगी संस्थानच्या अधिकृत बँक खात्यात, किंवा पावती घेऊन रोख स्वरूपात करण्याची विनंती भाविकांना केली होती. आम्ही दर महिन्याला आलेल्या देणगीचा गोषवारा जाहीर करतो. यामुळे देणगीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असून, भाविकांना सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देत आहोत. जुलै महिन्यात २ लाख ७२ हजार ४३९ रुपये देणगी आली आहे. : ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष, श्री. कपालेश्वर संस्थान





गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरातील देणगीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला जात होता. मात्र, विश्वस्त मंडळ कार्यरत झाल्यानंतर आम्ही भाविकांमध्ये जनजागृती करून देणगी संस्थानच्या अधिकृत बँक खात्यात, किंवा पावती घेऊन रोख स्वरूपात करण्याची विनंती भाविकांना केली होती. आम्ही दर महिन्याला आलेल्या देणगीचा गोषवारा जाहीर करतो. यामुळे देणगीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असून, भाविकांना सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देत आहोत. जुलै महिन्यात २ लाख ७२ हजार ४३९ रुपये देणगी आली आहे. : 