एका दिवसात सोनसाखळी चोरांनी लुटले ६५ ग्रॅम सोने !
सोनसाखळी चोरांसह सोनारांना सहआरोपी करण्याची मागणी !
नाशिक : दिवाळी सण सुरु होण्याच्या आदल्यादिवशी चोरटयांनी शहरात ठिकठिकाणी चैन स्नॅचिंग करीत महिलांच्या अंगावरील सव्वादोन लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. विशेष म्हणजे या सर्व सोनसाखळी चोरी भरवस्तीत झाल्याने चोरट्यांना पोलिसांचा कुठलाच धाक उरलेला दिसत नसल्याचे दुर्दैवी चित्र शहरात पुन्हा दिसू लागले आहे. सोनसाखळी चोरांनी पुन्हा आपले डोके वर काढल्याने या चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोने खरेदी करणाऱ्या सोनारांना देखील सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे सणासुदीच्या काळात महिला वर्गात मोठी दहशत पसरली आहे.
सोमवार दि. २८ पासून वसुबारस सणाने दिवाळी सणाची सुरवात झाली आहे. मात्र, या सणाच्या आदल्या दिवशी पंचवटी उपनगर आणि नाशिकरोड येथे वृद्ध महिलांना आपले शिकार करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या आहे. जवळपास ६५ ग्रॅम सोने यामध्ये चोरी गेले आहे. ज्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे पाच लाखांपेक्षा अधिक असल्याचे समजते. मात्र, नेहमीप्रमाणे पोलीस दप्तरी सोने खरेदी करीत असताना ज्या भावाने खरेदी केले आहे. तोच भाव दाखविला गेल्याने या सोन्याची किंमत पोलीस दप्तरी २ लाख ३० हजार झाल्याने या सोन्याची चकाकी गायब झाल्याचे दिसत आहे. किंमत कमी दिसत असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य देखील कमी होताना दिसत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी लीली अँड्रू फर्नांडिस, ५०, रा. हरिभाई बिल्डिंग, इंद्रकुंड, पंचवटी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार रविवार दि. २७ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील गुंजाळबाबा डेअरी जवळ लाल दुचाकी वरून आलेल्या अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन आणि मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याबाबत फिर्यादी प्रतिभा विजय माळवे, ५३, रा. जगताप मळा तरणतलावाजवळ, नाशिकरोड यांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा माळवे या रविवार दि. २७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कामावरून बसने बिटको चौकात उतरून घरी पायी जात असताना जगताप मळा परिसरात त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत पाठीमागून आलेल्या अज्ञात मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली असून, याबाबत फिर्यादी नलिनी वासुदेव भोळे, ७०, रा. जेलरोड, नाशिकरोड यांनी गुन्हा दाखल केला आहे. नलिनी भोळे या शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मिठाई घेऊन जेलरोड येथील खाचणे हॉस्पिटलसमोरून पायी जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची १ लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओढून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही चोरीच्या घटना वगळता अनेकदा सोनसाखळी चोरांना पोलीस अटक करतात. त्यांनी ज्या सोनारांना चोरीचे सोने विकले आहे. त्यांच्याकडून सोन्याची लगड देखील पोलिसांकडून जप्त केली जाते. मात्र, अशा चोरीचे सोने घेणाऱ्यांचा समावेश पोलीस गुन्ह्यात करीत नाही. त्यामुळे सोनार मोकाट असतात आणि पुन्हा चोरीचे सोने विकत घेतात. त्यामुळे सोनसाखळी चोरांकडून ज्या सोनाराने सोने विकत घेतले आहे. अशा सोनारांना देखील सहआरोपी करण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण केली जाते. काही पोलीस ठाण्यातील सुभेदार तर थेट सराफ बाजारातून सोनारांकडून हप्ते देखील गोळा करीत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यापुढे सोनसाखळी चोरांकडून चोरीचे सोने घेणाऱ्यांनाही सहआरोपी केल्यास शहरातील सोनसाखळी चोरीवर काहीसा अंकुश येण्यास मदत होईल यात शंका नाही.





