नाशिकच्या रस्त्यांनी घेतला पुन्हा दोन युवकांचा बळी !
यापूर्वी एका महिलेचा खड्डयात पडून झाला होता मृत्यू !
नाशिक : सीबीएस कडून सिटीसेंटर मॉलच्या रस्त्याने पुढे सिडको आणि पाथर्डी फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन युवकांचा दुचाकी अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या कचवर दुचाकी स्लिप झाल्याने दोन महाविद्यालयीन तरुणांचा बांधकाम भवन येथे अपघात झाला होता. या ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर युवकांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नाशिकच्या रस्त्यांनी आत्ता ठिकठिकाणी नागरिकांचे बळी घेण्यास सुरुवात केल्याने नाशिकरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, शनिवार दि. २६ रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अभिजित अशोक मराठे (२३, दामोदर नगर, पाथर्डी फाटा) आणि मयूर जगदेव कावरे (२३, अष्टविनायक चौक, सावता नगर सिडको) हे त्यांच्या दुचाकी वरून जात असतांना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून त्यांचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटल्याने येथील दुभाजकावर दुचाकी आपटल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागला होता. अपघात घडल्यानंतर येथील काही नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे.
अभिजीत मराठे हा एमसीएचे शिक्षण घेत होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून अभिजित आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. आई वडील पाथर्डी फाटा येथे दामोदर नगर येथे राहतात.
मयुर जगदेव कावरे हा मित्राच्या फ्लॅटवर अभ्यास करण्यासाठी जात होता. शनिवारी त्याचा आयटीचा पेपर होता. पाटबंधारे ऑफिस समोर असलेल्या कचमुळे गाडी स्लीप होऊन अपघात झाल्याचे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. त्याच्या घरी देखील आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर जत्रा चौफुली येथे ३ ऑक्टोबर रोजी सविता संजू शिरसाठ, ५०, रा. रॉयल रेसिडेन्सी, आडगाव शिवार, नाशिक या महिलेचा रस्त्यावर पडलेल्या खड्डयात दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा या दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा रस्त्यावर पडलेल्या कचमुळे मृत्यू झालेल्या नाशिकचे रस्ते जणूकाही मृत्यूचे सापळे बनल्याचे भयाण वास्तव दिसू लागले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने रस्ते बनवणारे आणि त्याला पडलेले खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





